अर्थ-उद्योगराजकारण

परमबीर सिंग यांच्या आदेशानेच सचिन वाझेकडून खंडणी वसुली

'कार डिझायनर' दिलीप छाबरियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरुनच निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे खंडणी वसुली करत होता, असा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाबरिया यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे, रियाझ काझी खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचा दावाही छाबरिया यांनी केला आहे. चार महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर छाबरिया सध्या जामिनावर बाहेर आहेत.

“माझ्या डीसीपीडीएल कंपनीत ५२ टक्के शेअर्स असलेल्या किरण कुमार, इंदरमल रामाणी यांच्यावर सीआययू युनिटच्या पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरुन माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसुली करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाबरिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केला आहे. २५ कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा १५ हून अधिक गुन्ह्यांना सामोरे जा, असं धमकावल्याचा दावाही छाबरियांनी केला आहे.

परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे, रियाझ काझी खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असून सीआययू युनिटच्या अंतर्गत तपास येत असलेल्या सर्व प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी छाबरिया यांनी केली आहे. मुकेश अंबानी अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझे आणि रियाझ काझी या दोघांचं पोलिस खात्यातून निलंबन करण्यात आलं आहे.

दिलीप छाब्रिया हे देशातील सुप्रसिद्ध कार डिझायनर आहेत. सेलिब्रिटी आणि धनाढ्यांच्या कार डिझाईन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शाहरुख खानची व्हॅनिटी व्हॅनही दिलीप छाब्रियांनीच डिझाईन केली होती. क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने दिलीप छाब्रियांविरोधात २०१५ मध्ये तक्रार नोंदवली होती. दिलीप छाब्रियांनी पाच लाख रुपये घेऊनही आपले काम योग्य पद्धतीने न केल्याचा आरोप दिनेश कार्तिकने केला होता.

डिझायनर कार खरेदी-विक्री आणि फायनान्स करुन अनेकांची कोट्यवधींना फसवणूक करण्याच्या कथित घोटाळ्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. हे रॅकेट देशातील अनेक राज्यात पसरल्याचा अंदाज वर्तवला जात होता. या गुन्ह्यात दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. दिलीप छाब्रिया डिझाईन्स प्राव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहेत.

कपिल शर्माची तक्रार

कॉमेडियन कपिल शर्माच्या तक्रारीनंतर कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. देशातील सर्वात चांगली व्हॅनिटी व्हॅन बनवून देण्याच्या आमिषाने छाब्रियांनी जवळपास साडेपाच कोटी रुपये उकळल्याचा आरोप कपिल शर्माने केला होता. कपिल शर्माच्या तक्रारीनंतर मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button