आरोग्य

लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून; लसीचा पुरेसा साठाच नसल्याने अनेक राज्यांची लसीकरणास असमर्थता

नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. या टप्प्यात १८ ते ४५ वर्षामधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचे रजिस्ट्रेशन २८ एप्रिलपासून सुरू झालं असून आतापर्यंत ८० लाखांहून अधिक लोकांनी आपल्या नावाची नोंद केली आहे. असं असलं तरी या देशभर राबवण्यात येणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या कार्यक्रमासमोर काही अडचणी आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालसहित देशातील ११ राज्यांमध्ये आजपासून या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करता येणं शक्य नसल्याचं त्या राज्यातील सरकारांनी स्पष्ट केलं आहे. लसींची असलेली कमतरता हे यामागचे कारण सांगण्यात येतंय.

देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून या राज्यात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या, मृत्यू आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. महत्वाचं म्हणजे देशातील सर्वाधिक लसीकरण याच राज्यात झालं आहे. महाराष्ट्रात आजपासून व्यापक लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात येणार होती. यामध्ये १८ ते ४५ वर्षामधील लोकांचे लसीकरण करण्यात येणार होते. मात्र लसींचा पुरवठा कमी असल्याने राज्यात मोजक्या स्वरुपात लसीकरण होणार आहे. या मोहिमेसाठी राज्याला तीन लाख डोस उपलब्ध झाले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात मोजक्या स्वरुपात आज हे लसीकरण सुरु होणार आहे.

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास राज्य शासन तयार असून यासाठी लागणारी सर्व रक्कम एका चेकद्वारे देऊन लस विकत घेण्याचीही तयारी आहे. परंतु लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लगेच १ मे पासून लस केंद्रांवर गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्य शासनाने ही लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात या वयोगटात ६ कोटी नागरिक आहेत, त्यांना प्रत्येकी २ डोस म्हटले तरी १२ कोटी लसींची आवश्यकता आहे. आपण दररोज १० लाख लोकांचे लसीकरण करु शकतो एवढी महाराष्ट्रात क्षमता आहे. परंतु लस वितरण हे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरप्रमाणे केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे.

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील लसींचा साठा पुरेसा नसल्याचं कारण देत आजपासूनच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे १८ वर्षावरील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊ नये असंही आवाहन त्यांनी केलंय. दिल्लीतील नागरिकांना लस उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्येही आजपासून सुरू होणारे १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण होणार नाही. ज्यावेळी राज्याला डोस उपलब्ध होईल त्यावेळी या वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू करण्यात येईल असं राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. तोपर्यंत ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरूच राहणार आहे.

पंजाब : पंजाबचे आरोग्य मंत्री बलबीर सिंह सिद्धू यांनी सांगितलं की, राज्याकडे लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण आजपासून होणार नाही.

गोवा : गोव्यातही लसींच्या कमतरतेमुळे आज तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरूवात होणार नाही.

उत्तराखंड : उत्तराखंडमध्येही लसींची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या कार्यक्रमाला नेमकं कधी सुरुवात होईल हे सांगू शकत नसल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

जम्मू काश्मिर : जम्मू काश्मिरमध्येही कोरोनाच्या लसीच्या कमतरतेमुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सध्या सुरू होणार नाही.

कर्नाटक : लसींचा पुरवठा योग्य वेळेत न पोहोचल्याने, आजपासून 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार होती त्या कार्यक्रमात बदल झाल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

बिहार : बिहारमध्येही आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू होणार नाही. लसींची कमतरता हेच यामागचे कारण आहे.

आंध्र प्रदेश : राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, राज्यात आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू होणार नाही.

ओडिशा : ओडिशा राज्यात एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन सुरू आहे आणि त्यातच कोरोना लसींची कमतरता असल्याने तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरूवात होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button