मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. ठाकरे सरकारच्या दोन वर्षाच्या कामकाजावर बोलण्यासाठी शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. पिता, पुत्र आणि पुतण्याभोवती फिरणारं सरकार अशी खरमरीत टीका शेलार यांनी केलीय. काही वर्षापूर्वीचे प्रसिद्ध नाटक ‘तीन पैशाचा तमाशा’ अशीच आजच्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. असं शेलार म्हणालेत.
सत्तेचा उपभोग, त्यातून संपत्तीचे निर्माण हेच सुरु होते. हे सरकार जनता केंद्रीत होण्यापेक्षा पिता, पुत्र आणि पुतण्या यांच्या भोवती फिरत आहे. महाराष्ट्राची बदनामी याच पुत्र प्रेम आणि पब, पार्टी, पेग आणि पेग्वीन यामुळ झाली. असा घणाघातही शेलार यांनी केलाय.
मंदिरासाठी लोक आंदोलन करतात पण सरकारची भुमिका मदिरालय सुरु करायची होती. आमचा विरोध या गोष्टींना नाही तर प्राध्यान्यक्रमाने आहे. सुपुत्रीच्या प्रेमात काही चूक नाही, मात्र पुत्रीच्या प्रेमापोटी अनिल देशमुखांना गृहमंत्री बनवले जाते आणि महाराष्ट्राची प्रतिमा देशात खराब होते. असा टोला शेलार यांनी पवारांना लगावलाय. पुतण्याबद्दल काय सांगावे त्यांच्या भितीने त्यांना वरच्या पदावर बसवले जाते. मग एक हजार कोटीच्यावर बेनामी संपत्ती दिसते, असा आरोपही शेलार यांनी केलाय. तर जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीवरूनही शेलार यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. पीएमआरडीएत भूखंडाचे श्रीखंड बघायला मिळते. सरकारची कार्यपद्धती स्पष्ट आहे. अतर्क, असनदशीर आणि अहंकार अशीच आहे. पेट्रोल-डिझेलचा व्हॅट कमी होत नाही आणि दारुवरील कर कमी होतो? असा सवालही शेलार यांनी केलाय.
मी मंत्रालयात येणार नाही. काय करायचे ते करा…मी अधिवेशन घेणार नाही, माझ्याविरोधात कार्टून सर्क्युलेट केले तर अटक करु, माझ्या विरोधात बोललात तर तुम्ही केंद्रीय मंत्री असला तरी तुम्हाला अटक करु, अशी दडपशाही केल्याचा आरोप शेलार यांनी केलाय. वेगवेगळ्या वर्तमानपत्रात जाहीरात देवून वातावरण निर्मिती करण्यात आलीय. आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रकटीकरणाचा दिवस आहे, असंख्य वेदना जनतेला भोगाव्या लागत आहेत, त्याचे सरकारला काही देणेघेण आहे का? असा सवालही शेलार यांनी केलाय.