नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गेल्यानंतर शिवसैनिकांनी स्मारकाचं शुद्धीकरण केलं. या प्रकरणावरुन भाजप-शिवसेनेमध्ये शाब्दिक चकमक उडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी घणाघाती टीका केली.
ज्या लोकांनी हे केलं त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. मी तर म्हणेन एकप्रकारे बुरसटलेले तालिबानी मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी ही शिवसैनिकांची कृती नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.
काल आम्ही सवाल विचारला की, ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवून बाळासाहेबांच्या समाधीवर जर कुणी जात असेल तर ती समाधी अपवित्र झाली असे सांगतात हे कितपत योग्य आहे? मला असं वाटतं की ही कृती अतिशय अयोग्य आहे, असं फडणवीस म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले म्हणून त्या जागेचे शुद्धीकरण केले गेले.
उद्धव ठाकरे यांनी अबू आझमीशी हातमिळवणी करून आणि सोनिया गांधींसमोर नतमस्तक होऊन बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे.
मग त्यांचे पण शुद्धीकरण केले जाणार का?— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 20, 2021
नारायण राणेंचे शिवसेनेला तोडीत तोड प्रत्युत्तर
नारायण राणे यांनी स्मारकाचे शुद्धीकरण करण्याच्या प्रकारावरून जोरदार हल्ला चढवला. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळाची अवस्था आधी पाहा. स्मृती स्थळ दलदलीत आहे. आधी ते पाहा. मग शुद्धीकरण करा. गोमूत्रं शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतचं मन शुद्धीकरण करा, असा हल्ला नारायण राणे यांनी चढवला.
राणेंना येऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता. पण मी पोहोचलो. तिथे कुणीही नव्हते. उद्धव ठाकरेही नव्हते. मी असतो तर उभा राहिलो असतो, अडवलं असतं. हे काय आहे. पाच सहा जणांना दोनशे दोनशे रूपये देऊन शुद्धीकरणासाठी पाठवलं. शुद्धीकरणासाठी ब्राह्मण लागतो. शिवसेनेकडे आहेत कुठे? आमच्याकडे मागायला हवा होता. आमच्याकडे खूप आहेत, असा टोला राणे यांनी लगावला.
राणेंनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला. ज्यांना गोमूत्र शिंपडायचं आहे त्यांना शिंपडून द्या. ते स्मारक दलदलित आहे. फोटो पण साहेबांचा नीट दिसत नाही. आधी स्वतःचं मन शुद्ध करा. येऊ देणार नाही असं म्हटलं पण आम्ही गेलो तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. मी जर त्यांचा पुत्र असतो तर येऊच दिलं नसतं. आणि शुद्धीकरण करायला ब्राह्मण लागतात ते कुठे होते? आम्हाला सांगा आमच्याकडे ब्राह्मण आहेत, आम्ही दिले असते, असा हल्लाबोल राणे यांनी केला.
फक्ता गोमूत्रं आणि गोमूत्रं या एकाच विषयासाठी आलो आहोत का? मला कुणाला नमस्कार करावा वाटतो, कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे. ते गोमूत्रं ज्यांना शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या. ज्यांना प्यायचं त्यांना पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध आहे. ज्यांनी शिंपडलं त्यांना विचारा. काय दुषित झालं होतं. एवढं जर स्मारकाचा अभिमान असेल ना ते स्मारक ज्या स्थितीत आहेत. तिथे जाऊ शकत नाही. पँटवर करून मी आत गेलो. दलदलीत ते स्मारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत. अनेक स्मारकं मी पाहिलं. अत्यंत सुशोभित असतात. लॉन आहे. फुलझाडं आहेत. इथे काय आहे. इथे तर फोटोही साहेबांचा दिसत नाही. जे गोमूत्रं शिंपडायला आले ना त्यांनी जागतिक किर्तीचं स्मारक करण्याचा प्रयत्न करा. मग कारभार करा, असं ते म्हणाले.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बैठक होणार आहे. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. बैठकीबद्दल ऐकून आनंद वाटला. मी ३९ वर्षे शिवसेनाप्रमुखांसोबत होतो. त्यांची विचारधारा हिंदुत्वाची होती. त्यांनी हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी सर्वकाही केलं. त्यांनी सत्तेच्या लोभासाठी हिंदुत्वाचा त्याग केला नाही. आताची शिवसेना लाचारी करत आहे. त्याचा एक भाग म्हणून आजची बैठक होत आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.