Top Newsराजकारण

दोन-चार खासदार असणाऱ्या पक्षाच्या मंत्र्याने भाषा जपून वापरावी; फडणवीसांचा धनंजय मुंडेंना टोला

सोलापूर: भाजपला मातीत गाडा, असं विधान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. मुंडे यांच्या या विधाना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. अरे वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. आम्हाला गाडण्याची भाषा करू नका. दोनचार खासदार असणाऱ्या पक्षाच्या मंत्र्याने अशी भाषा वापरू नये, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. अक्कलकोट येथे फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचे आज भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. एककिडे शेतकरी आत्महत्या करतोय, एसटीचे कामगार संप करत आहेत. मात्र दुसरीकडे हे मंत्री नाचगाण्याचे कार्यक्रम करत आहेत, अशी टीका करतानाच अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. आम्हाला गाडण्याची भाषा करू नका. आमचा एक कार्यकर्ता तुमच्यासाठी पुष्कळ आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

ज्या लसीला तुम्ही मोदींची लस म्हणत होता, तीच तुम्हाला घ्यावी लागली.कारण ती भारताची लस होती. १०० कोटींचे लसीकरण करून राहुल गांधींना उत्तर दिले, असं त्यांनी सांगितलं. एककीडे शेतकऱ्यांची लाईट कट केली जातेय, अशा अहंकारी लोकांना लोकं गाडल्याशिवाय राहणार नाही, असं सांगतानाच आपण शिर्डीसारखं अक्कलकोट करून दाखवू, असं ते म्हणाले. यावेळी अक्कलकोटमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

बऱ्याच दिवसांपासून अक्कलकोटला येण्याची ओढ होती. तीर्थक्षेत्री आलेल्या लोकांना एक ऊर्जा मिळते. तीर्थक्षेत्र असणारी शहरं उत्तम करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. आपलं सरकार असताना १६६ कोटी रुपयांचा शहराचा आराखडा मंजूर केला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यातील २० कोटी रुपये दिले होते. ईश्वराला आणि देवाला प्रार्थना करतो ऊर्वरीत आराखड्याला निधी देण्याची सुबुद्धी सरकारला द्यावी, असं ते म्हणाले. जेव्हा जे व्हायचं असत तेव्हा ते होणारच असतं. सत्तेकडे आस लावून बसणारे लोक आपण नाहीत, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

आजचा दिवस आज सुवर्ण अक्षरात लिहला जाणार आहे. पालखी मार्गाचे भूमिपूजन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नितीन गडकरी यांनी वेगवेगळ्या रस्त्यांसाठी निधी दिला आहे. सरकारला दोन वर्षे झालीत. मात्र सरकार शेतकऱ्यांकडे कुणी पाहायला तयार नाही. हे सरकार फक्त वसुली करणारं सरकार आहे. शेतकरी भेटला त्याच्याकडून वसुली कर… सामान्य माणूस भेटला त्याच्याकडून वसुली कर… असे प्रकार सध्या सुरू आहेत. यापूर्वी असं वसुली सरकार कधी पाहिलं नव्हतं, असा टोलाही त्यांनी हाणला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button