नव्या कोरोना रुग्णांची संख्या तीन महिन्यांनंतर प्रथमच सर्वात कमी

नवी दिल्ली : देशात १३२ दिवसांनंतर प्रथमच नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या खाली आली आहे, तर १२४ दिवसांनंतर उपचाराधीन रुग्ण चार लाखांच्या आत आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या ३,९८,१०० असून, एकूण रुग्णांच्या संख्येत हे प्रमाण १.२७ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ टक्के आहे.
देशात मंगळवारी कोरोनाचे २९,६८९ नवे रुग्ण आढळले, तर ४१५ जणांचा मृत्यू झाला. देशात आता एकूण मृतांची संख्या ४,२१,३८२ झाली आहे.२४ तासांत नव्या रुग्णांची संख्या १३,०८९ ने कमी झाली, तर एकूण बाधितांच्या संख्येत मृत्यूदर हा १.३४ टक्के आहे. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत ४४.१९ कोटी लोकांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस दिली गेली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे ३,१४,४०,९५१ रुग्ण आहेत. सोमवारी १७,२०,११० कोविड चाचण्या घेतल्या गेल्या व या बरोबर आतापर्यंत ४५,९१,६४,१२१ चाचण्या केल्या गेल्या. रुग्ण सकारात्मक निघण्याचा दैनिक दर १.७३ टक्के तर साप्ताहिक दर २.३३ टक्के आहे.



