लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम; राज्यात ५१,८८० नवे कोरोना रुग्ण
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५१ हजार ८८० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८९१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४८ लाख २२ हजार ९०२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७१ हजार ७४२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६ लाख ४१ हजार ९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी दिवसभरात राज्यात ६५ हजार ९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ४१ लाख ७ हजार ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.१६% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ८९१ मृत्यूंपैकी ३९७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३६ मृत्यू, नागपूर-५९, ठाणे-३०, नाशिक-२९, जळगाव-२०, नंदूरबार-१८, पुणे-१७, चंद्रपूर-१२, औरंगाबाद-८, भंडारा-८, गडचिरोली-५, ज़ालना-४, गोंदिया-३, नांदेड-३, सोलापूर-३, वाशिम-३, अहमदनगर-२, सांगली-२, यवतमाळ-२, हिंगोली-१, कोल्हापूर-१, लातूर-१, पालघर-१, परभणी-१, रायगड-१, रत्नागिरी-१ आणि सातारा-१ असे आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८१ लाख ५ हजार ३८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८ लाख २२ हजार ९०२ (१७.१६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ३६ हजार ३२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३० हजार ३५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.