नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांवर पोहोचला आहे. काही राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात कोरोना लसीकरणही वेगाने सुरू आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी हे विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. आता राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. ‘मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही!’ असं म्हणत कोरोना लसी कुठं आहेत असा सवालही त्यांनी केला. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये देशातील कोरोना लसीकरणासंदर्भातील आकडेवारी देण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी डिसेंबर २०२१ पर्यंत देशात ६० टक्के लोकसंख्येला कोरोना लसीकरणाचे २ डोस देणं आवश्यक आहे असं म्हटलं आहे.
मंत्रियों की संख्या बढ़ी है,
वैक्सीन की नहीं!#WhereAreVaccines pic.twitter.com/gWjqHUVdVC— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 11, 2021
दररोज किमान ८८ लाख जणांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. मात्र मागील ७ दिवसांत दररोज सरासरी केवळ ३४ लाख जणांचेच लसीकरण केलं जात आहे. दुसरीकडे गेल्या ७ दिवसांत दररोज सरासरी ५४ लाख लसींचा तुटवडा आहे अशी माहिती राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आहे. केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही… शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार, असं म्हणत काही दिवसांपूर्वी राहुल यांनी टीकास्त्र सोडलं होतं. केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगा लावणार. संपत्ती, आरोग्य आणि आपला जीव गमावणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.