Top Newsराजकारण

वेडे लोक कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा; संजय राऊतांचा कंगनाला टोला

मुंबई: अभिनेत्री कंगना रणौतने महात्मा गांधींबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. वेडे लोकं बरळत असतात. ते का बरळतात? ते कोणत्या नशेत बरळतात याचा तपास एनसीबीने करावा, असा चिमटा संजय राऊत यांनी कंगनाला काढला आहे. संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना हा टोला लगावला.

चीनने आपल्या गालावर थप्पड मारली आहे. चीन लडाखमध्ये घुसला आहे. चीन अरुणाचल प्रदेशात घुसला आहे. तरीही आम्ही दुसरा गाल पुढे केला आहे. काश्मीरमध्ये पंडितांच्या हत्या होत आहेत. या देशात बरंच काही चाललं आहे. हे त्या मॅडमला माहीत असलं पाहिजे. आज देशाची अवस्था काय आहे हे त्यांना माहीत पाहिजे. महात्मा गांधी विश्वनायक होते. त्यांच्याशी काही मतभेद असू शकतात. बाळासाहेबांनीही त्यांच्यावर टीका केली. पण त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली. त्यांनी स्वातंत्र्य संग्रमाला दिशा दिली. मोदीही आज गांधी जयंतीला राजघाटावर जाऊन फुले अर्पण करतात. या मॅडमला हे माहीत पाहिजे. आज संपूर्ण देश आणि विश्व गांधी विचारांने प्रभावित आहे, असं त्यांनी सांगितलं.

खरा धोका नकली हिंदुत्ववाद्यांकडून

तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं दसऱ्या रॅलीचं भाषण ऐकलं असेल. त्यावेळी त्यांनी या देशाला खरा धोका नकली हिंदुत्ववाद्यांकडून असल्याचं म्हटलं होतं. निवडणुका येतात तेव्हा हे लोक हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करतात. भारत-पाकिस्तान वाद काढतात. निवडणूक जिंकण्याची एकही संधी सोडत नाहीत. दंगल भडकावी आणि हिंसाचार व्हावा असं या लोकांना वाटतं. हे लोकं कोण आहेत सर्वांना माहीत आहे. पार्टी प्रमुख उद्धव ठाकरेंनी अशा लोकांना खुले आव्हान दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

फडणवीसांना चिमटा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत कोण होतास तू काय झालास तू… असं म्हणत संजय राऊतांना टोला लगावला. त्यावरून राऊत यांनी पलटवार केला आहे. ते खूप जुनी गाणी ऐकतात. त्यांना भरपूर वेळ आहे. आम्ही कोण आहोत हे सर्वांना माहीत आहे. तुम्ही काय होतात… तुमची काय अवस्था झाली हे सर्वांना माहीत आहे. ही अवस्था अशीच राहिली तर पुण्यताील येरवडा इस्पितळात तुम्हाला दाखल करण्याची वेळ शकेल. अशी वेळ येऊ नये ही प्रार्थना करतो. निराशाचं अजीर्ण झालं तर असं होतं. फ्रस्टेशन आहे. निराशा आहे. जेव्हा निराशा प्रमाणबाहेर जाते तेव्हा अशी विधान येतात, असा चिमटा त्यांनी काढला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button