राजकारण

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाढ चिघळणार

महाविकास आघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम; तर १८ गावांचे दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या भूमीचे संपादन झाले आहे त्यांच्या माध्यमातून जन आंदोलन छेडण्यात आले आहे. स्वर्गीय दि. बा. पाटील यांनी केलेल्या जन आंदोलनामुळे साडे १२ टक्के भूखंड वाटप ही संकल्पना उदयाला आली होती. त्याचाच भाग असणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ज्या १८ गावांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या त्या गावातील ग्रामस्थांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे म्हणून जन आंदोलन छेडले आहे.

वेळ पडल्यास विमानतळाचे काम बंद पाडू असा थेट इशारा १८ गाव समितीच्या ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. महाविकास आघाडीचे स्थानिक नेते आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. महाविकास आघाडीचे नेते कायद्याची गोष्ट करतात. मात्र साडेबारा टक्के कायदा जन्माला घालणारे दि. बा. पाटील आहेत. ते आगरी समाजाचे असताना सर्वांनी त्यांच्या नावासाठी ठामपणे भूमिका घेणे गरजेचे असताना हे पुढारी दावणीला बांधलेले असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

महाविकास आघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम

नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांची दिशाभूल करण्याकरता तिथे गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते राजकारण करुन सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी प्रकल्पग्रस्तांना भडकविण्याचा घाट घातला आहे. मात्र, पनवेल उरण महाविकास आघाडीचे नेते विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीच्या समितीचे बबनदादा पाटील, आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर, आर. सी. घरत, जे. एम. म्हात्रे, महेंद्र घरत, प्रशांत पाटील, शिरीष घरत, काशिनाथ पाटील, सुदम पाटील, रामदास शेवाळे, रामदास पाटील, गणेश कडू, राजेश केणी, गुरुनाथ पाटील, हेमराज म्हात्रे, प्रदीप ठाकूर, दीपक घरत आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

विमानतळ नामकरणासाठी इतका अट्टाहास होता, तर प्रशांत ठाकूर सिडको अध्यक्ष असताना तसा ठराव का केला नाही? किंवा मग सहा महिन्यापूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी केली त्यावेळी हे स्वार्थी नेते कुठे गेले होते? जर यांना दि. बा. पाटील यांच्या नावासाठी झटायचे होते मग ६ महिने कोणाची वाट बघत होते? आज राज्यात महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे काम करीत आहे आणि भाजपचे राज्यातील नेते सरकार पाडण्यासाठी नको त्या थराला जात आहेत. अशीच परिस्थिती आता पनवेल उरणमधील स्थानिक भाजप नेते करत आहेत. मात्र असे करताना स्थानिक भूमिपुत्रांच्या वेळेचा गैरवापर करून त्यांना भडकविण्याचे गलिच्छ राजकारण रामशेठ ठाकूर करत आहेत, अशी टीका बबनदादा पाटील यांनी केली.

दि.बा.पाटील यांची अपूर्ण कामे आमच्यामार्फत सुरूच राहतील. स्थानिकांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांच्या गरजेपोटी घरांना कायम करण्यासाठी आमचा लढा सुरूच आहे, पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. आधीच त्रासलेल्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना भडकावून त्यांचे संसार कशाला उघड्यावर आणताय ? हे आम्ही खपवून घेणार नाही. दि.बा.पाटील हे आमचे आधार स्थान आहेत, त्यांच्या नावासाठी मोठे प्रकल्प आपल्यासमोर आहेत. मात्र विमानतळ नामकरणासाठी रामशेठ ठाकूर यांनी केलेलं गलिच्छ राजकारण पाहता पनवेल-उरण महाविकास आघाडी स्व. बाळासाहेब ठाकरे अंतरराष्ट्रीय विमानतळ या नावावर ठाम राहिली आहे आणि राहणार असल्याचा सूरही यावेळी लावण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button