Top Newsराजकारण

परमबीर सिंगच ‘अँटिलिया’ प्रकरणाचे मुख्य सूत्रधार : नवाब मलिक

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची वक्तव्ये ही राजकारणाने प्रेरीत असून अँटिलिया बॉम्ब प्लांटचे मुख्य सुत्रधार परमबीर सिंगच आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केला.

अँटिलिया बॉम्ब प्लांटनंतर मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. एटीएस या प्रकरणाचा तपास करत असताना अजून सत्य बाहेर येणार होते, त्याचवेळी एनआयएने तपास हाती घेतला. त्याचवेळी परमबीर सिंग यांच्या घरी बैठक झाली याचा उल्लेख आहे. कुरकुरे बालाजी यांच्या ईमेलचा उल्लेख आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे तयार करण्यासाठी पाच लाख रुपये देण्यात आले याचाही उल्लेख आहे. असे असताना अ‍ॅडिशनल चार्जशीट दाखल करणार असल्याचे सांगूनही एनआयएने चार्जशीट दाखल केली नाही याचा अर्थ केंद्र सरकारकडून परमबीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

परमबीर सिंग यांच्या माध्यमातून खोटे आरोप करण्यात येत असून जो या प्रकरणात मुख्य सूत्रधार आहे त्याचे वक्तव्य राजकारणाने प्रेरित आहेत. केंद्र सरकार परमबीर सिंग यांच्या माध्यमातून आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी व अडचणीत आणण्यासाठी कटकारस्थान रचत आहे. त्यांचे हे कटकारस्थान कोर्टात उघड होईल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सातत्याने साक्षीदार फुटत असल्याची बाब समोर येत आहे ही गंभीर बाब आहे असे नवाब मलिक म्हणाले.

यानिमित्ताने देशाच्या हितासाठी शहीद होणारे हेमंत करकरे यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. केंद्रातील सरकार बदलल्यानंतर सरकारी वकील आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे कोर्टाने या सर्व बाबीची दखल घ्यावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button