मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी परीक्षा ९ एप्रिल रोजी राज्य शासनाने पुढे ढकलली होती. आता ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. याबाबत परिपत्रक काढून आयोगाने विद्यार्थ्यांना सूचित केले आहे. राज्य सरकारनं ३ ऑगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय कळवला होता.
या परिपत्रकात म्हटलंय की, कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थिती संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनच्या अनुषगांने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतच माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन शनिवार दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्य शासनाने शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच एमपीएससीतर्फे घेतल्या जाणा-या विविध परीक्षा पुढे ढकलल्या. मात्र, सातत्याने ढकलल्या जात असलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थी नैराश्यात आहेत. परीक्षांचा तारखा जाहीर होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता होती. राज्याच्या शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या ९ ऑगस्ट रोजी तर अकरावी प्रवेशाची सीईटी येत्या २१ ऑगस्टला घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एमपीएससीनेसुध्दा संयुक्त परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात अशी मागणी उमेदवारांकडून केली जात होती.
एमपीएससीतर्फे २०१९ मध्ये संयुक्त परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर २०२० मध्ये घेतली जाणारी परीक्षा सहा वेळा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून सर्व विद्यार्थी परीक्षा केव्हा होणार या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता परीक्षेची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे महेश धरबुडे यांनी केली होती.
काही दिवसांपूर्वी परीक्षा प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. यावर राज्यभरातून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. हा असंतोष शांत करण्यासाठी सरकारने पुढे येत रखडलेल्या नियुक्त्या, परीक्षा आणि मुलाखती नियमित कशा होतील. याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली जाईल, अशी घोषणा केली होती.