अहमदनगर : भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाईवर जोरदार टीका केलीय. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पोलिसांच्या मदतीने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप विखे यांनी केला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात शिर्डी प्रांत कार्यालयासमोर भाजपने आंदोलन केले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या आंदोलनात राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, पोलिसांची मदत घेऊन महाविकास आघाडी सरकारने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना आहे. असं कधीही घडलं नाही. लोकशाहीत मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे. राज्य सरकार नालायक आहे, लोकांचे बळी जात आहेत, पण सरकार कामच करत नाही. असं असेल तर मग तुमच्या आरत्या ओवाळायच्या का?
जेव्हा जनतेची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटत असेल तर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? हा सामान्य माणसात दहशत निर्माण करण्याचा प्रकार आहे. याचा आम्ही निषेध करतो. शेवटी कायदा शिल्लक आहे, हे कायद्याचं राज्य आहे. त्यामुळे कायद्यानुसारच कारवाई करावी लागेल. महाडच्या न्यायालयाच्या निर्णयामुळं सरकार तोंडावर पडलंय. न्यायालयाने सरकारच्या एक प्रकारे कानशिलात लगावलीय, अशी टीका राधाकृष्ण विखे यांनी केलीय.
नीलम गोऱ्हे यांनी राजीनामा द्यावा
राधाकृष्ण विखे म्हणाले, नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा राजीनामा द्यावा. हे पद घटनात्मक पद आहे. ते कोणत्या पक्षाचे नसते. असं असतानाही त्या राजकीय भूमिका मांडतात, बोलतात. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली. सगळेच दाखले आता पोलिसांना द्यावे लागतील. सरकारला दोन नियम असू शकत नाही. राणे यांचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी लागलं. खरे तर मुख्यमंत्र्यांनी अगोदर माफी मागावी. देशाचा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव हे त्यांना समजत नसेल तर हा देशवासियांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.