नवी दिल्ली : आगामी काळात भाजपाला हरवणं इतकं सोप्पं नाही. पुढील काही वर्ष भाजपा केंद्रस्थानी राहणार आहे असा अंदाज वर्तवणाऱ्या निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या विधानावरुन वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेसला आरसा दाखवणं आणि राहुल गांधींवर निशाणा साधणं यावरुन प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीयांमध्ये कटुता आल्याचं बोललं जात आहे.
सोशल मीडियावरील व्हायरल चर्चेला वगळलं तर प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्यातील नात्यावर याचा काही परिणाम होणार नाही. याची ३ मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे ज्या कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी त्यांचे विचार मांडले ते सगळं ऑफ रेकॉर्ड होतं. कार्यक्रमातील एक व्हिडीओ कुणीतरी बनवला आणि तो व्हायरल झाला. दुसरं म्हणजे प्रशांत किशोर हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे पक्षाचे नियम त्यांच्यावर लागू होत नाहीत. इतकचं नव्हे तर ज्या समस्येबाबत प्रशांत किशोर यांनी व्हिडीओत म्हटलं आहे. त्याची माहिती गांधी कुटुंबाला आधीच आहे. अनेकवेळा प्रशांत किशोर यांनी काँग्रेसनं त्यांच्या रणनीतीत बदल केला पाहिजे असं सूचवलं आहे.
प्रशांत किशोर यांनी व्हिडीओत स्पष्टपणे सांगितले की, पुढील काही वर्ष भाजप राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशांत किशोर यांना भक्त म्हणण्यास सुरुवात केली. काँग्रेस नेते राहुल गुप्ता यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसनं किशोर यांना पद ऑफर केलं नाही त्यामुळे ते भाजपाचं गुणगान गाऊ लागले आहेत. भाजपाच्या चेहऱ्याचा पर्दाफाश झाला आहे. सुरुवातीला काँग्रेस विना विरोधी पक्ष नाही. त्यानंतर काँग्रेसमध्ये पद घेण्यासाठी विनवणी. काँग्रेसनं नाकारलं मग भाजपाच्या पायाशी लोटांगण. निष्कर्ष आणखी एका भक्ताचा मुखवटा उतरला असं गुप्ता यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.
प्रशांत किशोर हे मोदींसाठी यशस्वी ठरले. ममता यांच्यासाठी चांगले रणनीतीकार ठरले. परंतु काँग्रेससाठी काही खास करू शकले नाहीत. २०१७ मध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसनं प्रशांत किशोर यांची मदत घेतली होती. तेव्हा किशोर यांच्या सांगण्यावरुन राहुल गांधी यांनी खाट पंचायत, दिल्ली-मुंबई मॉडेल पुढे करत यूपीत शीला दीक्षित आणि राज बब्बर यांची एन्ट्री केली. परंतु निवडणुकीच्या निकालात प्रशांत किशोर यांची रणनीती फसली. त्यानंतर काँग्रेसचे काही नेते किशोर यांच्यावर नाराज झाले.
प्रशांत किशोर यांचा आमचा नेता मानत नाही असं राज बब्बर उघडपणे बोलले. आमच्यासाठी केवळ एक नेता राहुल गांधी. त्यामुळे २ वर्षात प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्यात दुरावा निर्माण झाला. परंतु २०२० मध्ये पुन्हा काँग्रेसला ग्राऊंड पातळीवर मजबूत उभं राहायचं होतं. तेव्हा प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठका सुरु केल्या. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी पीकेसोबत बैठक घेतली आणि रणनीतीवर चर्चा झाली. त्यानंतर पीके काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असंही बोललं गेलं. परंतु अद्याप किशोर यांनी पुढची वाटचाल स्पष्ट केली नाही.