आता संसदेच्या दारात २२ जुलैपासून शेतकऱ्यांचे शक्तिप्रदर्शन
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून देशातील विविध भागातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या महिन्यात होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनातील संयुक्त किसान मोर्चाने मोठी घोषणा केली आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आता पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या आवारात धडकणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात २२ जुलैपासून दररोज सुमारे २०० शेतकरी संसदेसमोर आंदोलन करणार आहेत.
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने विरोधी पक्षांच्या खासदारांनाही इशारा दिला आहे. संसदेमध्ये आमचा आवाज उठवा अन्यथा राजीनामा द्या, असे शेतकऱ्यांनी विरोधकांना सुनावले आहे. त्याआधी ८ जुलै रोजी पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसच्या वाढत्या किमतींविरोधात देशभरात आंदोलन होणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली.
तीन कृषी कायद्यांविरोधात ४० हून अधिक शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चाच्या झेंड्याखाली एकत्र आल्या आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी सभागृहात कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांना एक इशारा पत्र दिले जाईल, असे संयुक्त किसान मोर्चाने सांगितले.
शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले की, आम्ही विरोधी खासदारांनासुद्धा सभागृहामध्ये दरदिवशी या मुद्द्यावर आवाज उठवण्याचे आवाहन करणार आहोत. तर या कायद्यांच्या विरोधात आम्ही संसदे बाहेर आंदोलनास बसणार आहोत. संसदेतून सभात्याग करून केंद्र सरकारला लाभ न पोहोचवण्याचे आवाहन आम्ही करू जोपर्यंत सरकार या मुद्द्यावर आमचे समाधान करत नाही तोपर्यंत आम्ही संसदेचे कामकाज चालू देणार नाही.
संसदेचे पावसाळी अधिवेशन हे १९ जुलैपासून सुरू होणार आहे. राजेवाला यांनी सांगितले की, जोपर्यंत आमच्या मागण्या ऐकून घेतल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही संसदेबाहेर सातत्याने आंदोलन करू. या आंदोलनासाठी प्रत्येक शेतकरी संघटनेतून ५ जणांना घेतले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
तसेच संयुक्त किसान मोर्चा पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किमतींविरोधीत ८ जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले आहे. मोर्चाने जनतेला सकाळी १० ते दुपारी १२ या काळात जवळच्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर येऊन तिथे वाहने उभी करण्याचे आवाहन केले आहे.