नवी दिल्ली : दहशतीच्या बळावर लोकांवर काही काळ सत्ता गाजविणाऱ्या विघातक शक्तींचे अस्तित्व कायमस्वरूपी टिकणारे नसते, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. अफगाणिस्तानवर तालिबानींनी कब्जा केला असून, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले असावे, अशी चर्चा आहे.
गुजरातमधील सोमनाथ येथे पार्वती मंदिराचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते झाला. तसेच तेथील काही प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांनी केले. हा समारंभ व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. त्या वेळी मोदी म्हणाले की, देशातील धार्मिक पर्यटन वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. गेल्या कित्येक शतकांत सोमनाथ मंदिर अनेकदा उद्ध्वस्त करण्यात आले. त्यातील मूर्ती फोडण्यात आल्या. या मंदिराचे अस्तित्व जितक्या वेळा नष्ट करण्याचे प्रयत्न झाले, तितक्या वेळा हे मंदिर पुन्हा उभारले गेले.
मोदी म्हणाले की, देशातील सर्वांत मोठ्या ४० तीर्थक्षेत्रांचा केंद्र सरकार विकास करत असून, त्यातील १५ ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. गुजरातमध्येही प्रसाद योजनेच्या अंतर्गत तीर्थक्षेत्र विकासाच्या तीन प्रकल्पांचे काम सुरू असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांहून अधिक खर्च होणार आहे. हे सारे प्रकल्प भविष्यकाळात देशासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा विषय हा स्वतंत्र भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे हे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठामपणे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वदेशाचे उत्तम दर्शन सर्वांना घडावे यासाठी १५ विविध संकल्पनांच्या आधारे केंद्रीय पर्यटन खाते काही योजना अमलात आणत आहे. त्यामुळे पर्यटन व रोजगाराच्या संधी वाढून देशाच्या विकासाला हातभार लागेल.