मुंबई : शिवसेनेकडून आज पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना, ‘अभी तो सिर्फ टॉस हुआ है… मॅच अभी बाकी है’, असं सांगून गूढ वाढवले आहे. शिवसेना खा. संजय राऊत यांनीही शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र बोलणार आहे, अशा शब्दात गर्भित इशारा देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, भाजपचे साडेतीन लोक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील, असं राऊत सोमवारी म्हणाले आणि एकच राजकीय धुरळा उडाला. भाजपचे ते ‘साडेतीन’ कोण? या प्रश्नाचे उत्तर देत राऊत बॉम्ब फोडणार आहेत
संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. राऊत आज दुपारी ४ वाजता शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल शिवसेना भवन परिसरात पाहणी केली. तसंच शिवसेनेच्या सर्व नेत्यांना महत्वाच्या सूचनाही दिल्या.
केंद्र सरकार, ईडी आणि राज्यातील भाजपचे नेते आपल्याला जाणीवपूर्वक सापळ्यात अडकवून तुरुंगात धाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा घणाघाती आरोपही राऊतांनी केला. परंतु या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत केवळ शिवसेनाच नव्हे, तर महाविकास आघाडीवरील प्रत्येक हल्ला टोलवणार्या संजय राऊतांच्या सोबतीला एकही खंदा नेता उभा न राहिल्याने संजय राऊत कमालीचे उद्विग्नही झालेत. ही उद्विग्नता झकटून देत भाजपवर पलटवार करण्यासाठी संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेतून शिवसेना हा पक्ष बोलणार नसून महाराष्ट्र बोलणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत खरोखरच मोठा धमाका करतील की आपण एकटे नसून पूर्ण पक्षसंघटन आपल्या पाठीशी उभे असल्याचे दाखवण्यासाठी त्यांनी रचलेला हा फार्स आहे, हे दुपारच्या पत्रकार परिषदेतूनच उघड होईल.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर गंभीर आरोपांची मालिका सुरु केलीय. या आरोपांनंतर संजय राऊतांनी आक्रमक होत पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांची आणि केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल करणार असल्याचा इशारा दिलाय. मंगळवारच्या पत्रकार परिषदेकडे विरोधकांचं लक्ष असायलाच पाहिजे. त्यांनी माझी पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रमुखांनी तर आवर्जुन ऐकायला हवी. शिवसेना हा पक्ष नाही तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलणार आहे. मला वाटतं त्यांना कळेल महाराष्ट्र काय आहे ते. केंद्रीय तपास यंत्रणांचे जे धंदे सुरु आहेत ना ते बंद होणार उद्यापासून. शिवसेना हाच महाराष्ट्र आहे. कुणीही येतो आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. महाराष्ट्र उसळेल, अन्यायाविरुद्ध लढेल, नुसता लढणार नाही, तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश आहोत हे दाखवून देऊ. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जी मर्दानगी शिकवली, ती उद्या दिसेल, अशा शब्दात राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना इशारा दिला आहे.
राऊत पुढे म्हणाले की, कुणीही उठावं आणि महाराष्ट्राची बदनामी करावी हे चालणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच ही पत्रकार परिषद होईल. ही पोलखोल नाही, खोलायला त्यांच्याकडे आहे काय? ते आतून पोकळ आहेत, असा टोलाही त्यांनी भाजप आणि त्यांच्या नेत्यांना लगावला.
तत्पूर्वी राऊत यांनी काल सकाळीही माध्यमांशी संवात साधत भाजपला इशारा दिला होता. शिवसेनेची पत्रकार परिषद होईल. मीही असेल. शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी असतील. ही शिवसेनेची पत्रकार परिषद असेल. आम्ही बोलणार तेव्हा संपूर्ण देश ऐकेल. काय होतं ते बघाच. आता मी काहीच सांगणार नाही. पत्रकार परिषदेतच काय ते सांगू, असं सांगतानाच ‘हमने बहोत बर्दाश्त किया है, अब बर्बादही हम करेंगे’, असा इशाराच राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांच्या या इशाऱ्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच त्यांनी भाजपचे साडेतीन नेते लवकरच तुरुंगात असतील असा बॉम्बगोळा टाकल्याने भाजपचे ते तीन नेते कोण? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.