Top Newsफोकससाहित्य-कला

एका स्वरयुगाचा अंत; गानकोकिळा लतादीदींचे निधन

संपूर्ण देशावर शोककळा, दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा; आज सायंकाळी शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार

मुंबई : संगीत विश्वावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या स्वर्गीय स्वरयुगाचा अंत झाला आहे. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवल्याच्या अत्यंत दुर्दैवी बातमीमुळे केवळ संगीत विश्वावरच नव्हे तर साऱ्या देशावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र लतादीदींची तब्येत काल (शनिवारी) अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र रविवारी सकाळी ८.१२ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फक्त जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केले आहे.

लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते.

रविवारी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी लता मंगेशकर यांचे निधन झाले, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयतील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली. कोरोनाची लागण झाल्यापासून २८ दिवसांहून अधिक कालावधीनंतर अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. लतादीदींच्या निधनाने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी १२.३० वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. लता मंगेशकर यांच्या पश्चात तीन भगिनी, प्रख्यात गायिका आशा भोसले, संगीतकार मीना खडीकर, गायिका उषा मंगेशकर आणि बंधू सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आहेत.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. जवळपास गेल्या ३० दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. शनिवारी लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. त्याआधी लता मंगेशकर यांच्या भगिनी आणि प्रख्यात गायिका आशा भोसले, बंधू आणि सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी शनिवारी रात्री भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, रश्मी ठाकरे, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि श्रद्धा कपूर, पियुष गोयल यांनीही रुग्णालयात भेट दिली होती.

दैवी सूर हरपला

जवळजवळ सहा दशकांच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान कारकीर्दीत दीदींनी जितक्या संगीतप्रेमींना- मग तो सर्वसामान्य श्रोता असो किंवा दर्दी- ज्या प्रमाणात आनंद दिला आहे, तितका आनंद देशाच्या पॉप्युलर कल्चरच्या इतिहासात कुठल्याही इतर कलाकाराने दिलेला नाही. आकाशात देव आहे का असं कुणी विचारलं तर देवाचं माहित नाही. पण आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे!. दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो, अशा शब्दांत पु.ल.देशपांडे यांनी लतादीदींच्या महतीचं वर्णन केलं होतं.

हृदय आणि मन यांपासून देवाने आवाज सारख्याच अंतरावर ठेवला आहे असं म्हणतात. कोणतीही महान गायकी ही भावना आणि तंत्र या घटकांचा समन्वय असते. लता दीदींच्या आवाजात या दोन्ही घटकांचा अप्रतिम संगम झाला होता. लता दीदींची प्रतिभा बऱ्याच प्रमाणात निसर्गदत्त असली तरी त्यात उत्कट संगीतसाधना आणि कुशाग्र बुद्धिमत्ता यांचा खूप मोठा सहभाग होता. जोवर भारतीयांच्या मनात धर्मप्रेम व देशप्रेम जागं आहे तोवर प्रत्येक गणेशोत्सवात, शिवजयंतीला, स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी लतादीदींची गाणी ऐकू येत राहतील. कबीर, मीरा व सूरदासांच्या भजनांतून, ग़ालिबच्या गजलांतून, ‘शिवकल्याण राजा’तल्या गाण्यांतून, ज्ञानदेवांच्या पसायदानातून आणि तुकोबांच्या अभंगांतून त्यांचा आवाज मनामनांत कायमचा साठवून ठेवला जाणार आहे.

लता दीदींना २००१ साली संगीत क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दल ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांसह असंख्य पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. १९९२ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराचीही सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकरानंही १९८४ सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. जी अविरत सुरू आहे. लता दीदींच्या आयुष्याचा प्रवास जरी आज थांबला असला तरी दैवी सूरांमधून व सुमधुर आवाजातून भारतीयांच्या अंतकरणात दीदींनी लावलेला स्नेहदीप सदैव चैतन्यानं युक्त राहील.

पहिल्यांदा गाण्यातून लतादीदींनी कमावले होते अवघे २५ रुपये!

भारतरत्न पुरस्काराने गौरवलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म इंदौरमध्ये एका सामान्य मराठी कुटुंबात झाला. लता मंगेशकर यांचे पूर्वाश्रमीचे नाव हेमा होते. त्यांच्या जन्मानंतर पाच वर्षांनी त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे नाव लता ठेवले. लतादिदींनी ३६ पेक्षा अधिक भाषेतून त्यांनी गाणी गायिली असून ३० हजारपेक्षा अधिक गाणी त्यांनी म्हटली आहेत. अगदी लहान वयापासून त्यांनी अगदी कार्यक्रमातून गाणी म्हणायला सादर केली. लता मंगेशकर यांनी लहान असताना पहिल्यांदा रंगमंचावर गाणे सादर केले तेव्हा त्यांना २५ रुपये मिळाले होते. तिच आपली पहिली कमाई असल्याचे त्यांनी कायम सांगितले. त्यांनी १९४२ आलेल्या किती हसाल या चित्रपटासाठी गाणे म्हटले होते. ५ बहीण भावंडामध्ये सगळ्यात मोठी असलेल्या लता मंगेशकर यांनी विवाह केला नाही.

लता मंगेशकर यांच्या प्रारंभीच्या काळात लता मंगेशकर यांचा आवाज कमजोर असल्याचे सांगत त्यांना काम देण्यास टाळटाळ करण्यात आली. पण लता मंगेशकर आपल्या सूरासाठी पक्क्या होत्या. ज्या ज्या कोणी त्यांना चुकांचे निष्कर्ष सांगितले होते त्यांना सगळ्यांना त्यांनी दाखवून दिले. आणि त्यांचा आवाज कोमल आणि कमजोर असल्याचे चित्रपट दिग्दर्शक एस. मुखर्जी यांनी सांगितले होते.

वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांच्यावर विषप्रयोगही करण्यात आला असल्याचा उल्लेख लतादिदींची मैत्रीण पद्मा सचदेव यांच्या ‘कहां से लाऊ में’ या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. ही घटना आहे १९६३ मधील ज्या वेळी लता मंगेशकर यांना उल्ट्यांचा त्रास सुरू झाला होता. या काळात त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या सौम्य प्रकारच्या विषाचा प्रयोग केला गेला आहे.

आता लता मंगेशकर यांनीच आयुष्यातील कटू अनुभवाच्या काळातील पडदा हटवला आहे. त्याबाबत लतादिदी एका कार्यक्रमाच्या मनोगतात म्हणाल्या होत्या आम्ही मंगेशकर याबद्दल आता बोलत नाही. कारण तो आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता.

लतादिदींवर विषप्रयोग झाल्यानंतर त्यांना एकदा विचारण्यात आले की, तुम्हाला खरच डॉक्टरांनी सांगितले होते का, की, तुम्ही तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच तुम्ही गाऊ शकणार नाहीत. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, ही गोष्ट खरी नाही ती एक काल्पनिक घटना आहे. जे कधी काळी माझ्यावर सौम्य विषाचा प्रयोग झाला होता त्याची माझ्याभोवती रचलेली कथा होती.

लता मंगेशकरांना भारतातील तीन सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवलं गेले आहे. भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या महत्वाच्या पुरस्काराबरोबरच त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. १९७४ मध्ये लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आपली कला सादर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. २०११ मध्ये लता मंगेशकर यांनी सतरंगी पॅराशूट हे गीत गायिले होते. त्यानंतर आजपर्यंत त्या आपल्या गायिकीपासून दूर राहिल्या. १९४७ मध्ये आपकी सेवा या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

लता मंगेशकर यांनी लग्न का केलं नाही?

लतादीदींच्या करिअरचा ज्या-ज्या वेळी विषय निघतो, त्यावेळी त्यांच्या लग्नाचा विषय देखील निघतो. एवढी सगळी सुखं पायाशी लोळण घेत असताना लतादीदींनी लग्न का केलं नसावं? लग्न न करण्यामागे काही खास कारण असावं का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांचं लग्न न करण्याचं कारण त्यांची कुटुंबियांप्रप्रती निष्ठा दाखवते. भाऊ-बहिणींमुळे आपण लग्न न केल्याचं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं.

एवढ्या मोठ्या संगीत कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी लग्न का केले नाही, याची बरीच चर्चा होते. एकदा हाच प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारला गेला. त्यावर त्या म्हणाल्या, आमच्या वडीलांचं आम्ही खूप लहान असतानात निधन झालं होतं. अशा परिस्थितीत घरातील सदस्यांची जबाबदारी माझ्यावर आली. अशा परिस्थितीत मी लग्नाचा अनेकवेळा विचार करूनही तो विचार अमलात आणू शकला नाही. तो विचार केवळ विचारच राहिला. मी अगदी लहान वयातच काम करायला सुरुवात केली. वाटलं आधी सगळ्या लहान भावंडांना शिक्षण द्यावं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करावं. त्यानंतर बहिणींची लग्न झाली. त्यांना मुलं गेली. त्यामुळे त्यांना सांभाळण्याची जबाबदारी होती. असाच वेळ जात होता. त्यानंतर माझ्या लग्नाचा विचार मागे पडला. मी त्यांच्यातच गुंतून गेले.

लतादिदी राजघराण्याच्या सुनबाई झाल्या असत्या, पण…?

त्यांच्या लग्नाबाबत त्यावेळच्या मीडियामध्ये काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण खऱ्या बातम्या काही वेगळ्याच होत्या. वास्तविक राजस्थानच्या डुंगरपूर राजघराण्यातील राज सिंह डुंगरपूर यांची लता मंगेशकर यांच्याशी मैत्री होती. खरं तर राज सिंहची लता दिदींच्या भावाशी मैत्री होती, ते दोघे एकत्र क्रिकेट खेळायचे. राज सिंह शिक्षणासाठी मुंबईला आले होते, तिथे त्यांची लता मंगेशकरांशी भेट झाली. राज सिंह अनेकदा लतादीदींच्या भावाला त्यांच्या घरी भेटायला जायचे.

कालांतराने त्यांची लता मंगेशकर यांच्याशी मैत्री झाली. मात्र, दोघांचे लग्न होऊ शकले नाही. यामागचे कारण म्हणजे राज सिंह यांनी वडिलांना दिलेलं वचन होतं. ज्यामध्ये त्यांनी कोणत्याही सामान्य मुलीला राजघराण्याची सून बनवू नका असं म्हटलं होतं. यामुळे त्यांनी लग्न केले नाही. कदाचित हेच कारण असेल की दोघांनीही आयुष्यभर इतर कोणाशीही लग्न केले नाही, तरीही ते दोघे शेवटपर्यंत मित्र राहिले.

लता मंगेशकर यांच्या गायिकीचे एक युग

जसा आपल्या पूर्वजांचा आपल्याला वारसा आहे तसाच गायिकीमध्येही धृपद, ख्याल, भजन, ठुमरी हा ही एक सांगितिक वारसा लाभला आहे. आपण जर मागील शंभर वर्षातील भारतीय चित्रपटाचा इतिहासात डोकावून बघितलं, तर त्या काळातील गाणी ऐकली तर लक्षात येईल की, त्या त्या काळाला लतादिदींचा चित्रपटांना मिळालेला आवाज म्हणजे एक आशीर्वाद आहे. मागील काही दशकात अनेक दिग्गजांनी गायिकीमध्ये कमालीचे काम केले आहे. त्यामध्ये मग बडे गुलाम अली खॉं, अमीर खॉं साहेब आणि किशोरी अमोणकर यांनी संगीत क्षेत्रात खूप मोठं काम करुन ठेवलं आहे. पण त्यांची प्रत्येकाची गाणी ही त्यांच्या स्वतःसाठी होती. आणि इथूनपासूनच लता मंगेशकर यांच्या गायिकीचे एक युग सुरु होते.

दुसऱ्यांचा आवाज बनून गायिकी करणं म्हणजे कमालीची गोष्ट असते. तिच खरी कमालीची गोष्ट म्हणजे लता मंगेशकर यांचे गाणे आहे. सहगल उच्च दर्जाचा गायक असला तरी तो कधी दुसऱ्याचा आवाज होऊ शकला नाही. त्याचं गाणं बहुपदरी असूनही ते त्याच्यासाठीच राहिलं आहे.लता मंगेशकर यांचा आवाज म्हणजे चंद्रवर पोहचलेलं गाणं आहे. ते नील आर्मस्ट्ऱॉंग सारखं आहे. ज्यानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवण्याचं स्वप्न साकार केलं. आणि त्यााच यानात दुसऱ्या खिडकीत बसलेलं कोण असेल तर ती म्हणजे आशा भोसले.

लता मंगेशकर यांची गायिकीतील काही गोष्टी या आश्चर्यकारक वाटणाऱ्या असतात. उदाहरणार्थ कथा, व्यक्तिरेका, चित्रपट, संगीत आणि गीत मग ते कुणाचेही असले तरी त्याला लतादींदीचा आवाज लाभला तर मग ते गाणं लता मंगेशकर यांचंच होते. त्यांच्या गाण्यानंतर मग कोणतीच गोष्ट उरत नाही, आणि त्या गोष्टीना मग महत्वही राहत नाही. हिच एक भारतीयांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचा आवाज, चाल आणि त्यासाठी केलेली तयारी ही अत्युच्च पातळीवरचीच असते. समर्पण म्हणजे काय असते ते शिकावं ते लतादीदीं यांच्याकडूनच. म्हणूनच त्यांची गायकी इतरांपेक्षा वेगळी ठरते ती यामुळेच. त्यांच्या गायिकेत शतकानुशतके वेगळेपण जाणवत आले आहे कारण, त्यांची एक वेगळी अदा आहे आणि वेगळी शैली आहे, आणि गाण्याची वेगळी कला आहे. किंवा या सगळ्याचं मिळून एक वेगळं मिश्रण आहे.

https://twitter.com/fadnavis_amruta/status/1490182238734274563

लतादीदींचं गाणं म्हणजे अरेबियन नाईटस् मधल्या कथांसारखं आहे. ज्या कथांनी कैक वर्षे अखंड मानव जातीला भूलवून आणि खेळवून ठेवलं, ज्या कथांनी सुंदर असा फुलांचा गालिचा पसरला आहे, तसा आणि त्या कथांसारखा लता मंगेशकर यांची गाण्यांनी एक सुंदर गालिचा पसरला आहे. आणि त्या गालिचावर गेली ५० ते ६० वर्षे माणसं त्या गालिचाचा आनंद घेत आहेत.

लता मंगेशकर यांचं ‘रसिक बलमा’ तुम्ही ऐकलं असाल तर तुम्हाला संमोहित होणं काय असतं ते कळेल. लहान मुलं जशी जादू टोण्याच्या खेळात रंगून जातात, तसच लतादिदींचं गाणं ऐकले की आपणही मग त्यात रंगून जातो. संगीतकार सलीलदासारख्या गुंतागुंतीच्या सुरांची निर्मिती करणार्‍या, बनारससारख्या शहरातल्या गजबजलेल्या रस्त्यासारखी सूर निर्माण केले तरीही लता मंगेशकर त्या गजबजलेल्या रस्त्यांनी निवांतपणे फिरतात. ‘ओ सजना बरखा बहार आई’ ही ही अशीच एक रचना आहे, जी एका जटिल आणि अवघड जागांनी भरली आहे, पण ती लतादिदींच्यामुळे सहजतेने आली आहे.

गुलजार आपल्या गीताची आठवण सांगताना म्हणतात की, जेव्हा ‘घर’या सिनेमाच्या गाण्याची तालीम आम्ही करत होतो तेव्हा ‘आपकी आंखों में कुछ महके हुए से राज हैं’या ओळीनंतर आलेली ‘आपकी बदमाशियों के ये नये अंदाज हैं’या ओळीबद्दल मी प्रचंड नाराज होतो. त्यावेळी संगीतकार पंचम मला म्हणाले ‘शायरी में बदमाशी कैसे चलेगी? आणि म्हणाले फिर ये लता दीदी गाने वाली हैं.’त्यावर मी त्यांना म्हणालो तुम्ही ही ओळ आहे तशीच ठेवा, लताजींना नाही आवडलं तर मग मी काढून टाकतो. त्यानंतर त्या गाण्याच्या रेकॉर्डींगनंतर जेव्हा मी विचारलं की, गाणं कसं वाटलं तुम्हाला, चांगलं वाटलं ना. त्यावेळी माझ्यासोबत बोलताना त्या म्हणाल्या हां अच्छा था, आणि ती ‘वह बदमाशियों वाली लाईन?’असं विचारल्यावर त्या म्हणाल्या की, अरे तिच तर त्या गाण्यातील खास ओळ आहे. त्यामुळे तर हे गाणं वेगळं झालं आहे, आणि त्या ओळीमुळेच गाण्यात मज्जा आली आहे. ते गाणं ऐकताना तुमच्या लक्षात येईल की, त्यांच्या खनकदार हसण्यानं त्या बदमाशियों सारख्या शब्दाचा वापर करतात, आणि त्या त्यांच्या गाण्यातील भावनेला मग आणखी एका उंचीवर नेऊन ठेवतात.

लतादीदी यांनी व्यक्त केली होती ‘ही’ खंत

अनेक दशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीयांवर, संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे. लतादीदी यांनी आपल्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत अनेक टप्पे गाठले असले तरी त्यांच्या मनात एका गोष्टीची खंत कायम राहिली. पूर्णवेळ शास्त्रीय संगीत करता आलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत ही बाब सांगितली होती.

लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध गायक, संगीकार होते. लता मंगेशकर यांनी गायनाचे धडे वडिलांकडून गिरवले होते. लता मंगेशकर यांना आपल्या संगीत कारकिर्दीत तीन-चार गुरु लाभले होते. मास्टर दिनानाथ मंगेशकर हे त्यांचे पहिले गुरु होते. त्यानंतर अमान अली खाँ भेंडीबाजारवाले, अमानत खाँ देवासवाले यांच्याकडे लता मंगेशकर यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. त्याशिवाय, बडे गुलाम अली खाँ साहेबांच्या एका शिष्याकडेही लता मंगेशकर शास्त्रीय संगीत शिकले.

पुनर्जन्म मिळाला तर…

लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतावर प्रेम होते. मात्र, लहान वयात आलेल्या कौटुंबिक जबाबदारीमुळे लता मंगेशकर यांना पूर्णवेळ शास्त्रीय गायन करता आलं नाही. लता मंगेशकर यांनी एका मुलाखती सांगितले की, पुनर्जन्म मिळाला तर मला शास्त्रीय संगीत गायला अधिक आवडेल. या जन्मात ही इच्छा अपूर्ण राहिली होती. कौटुंबिक जबाबदारींमुळे पार्श्वगायनातून बाहेर पडण्याचा विचार करू शकत नव्हते. शास्त्रीय संगीतासाठी वेळ देणे अशक्य होते. त्यामुळे माझ्या आवडीला नाईलाजे मुरड घालावी लागली असे लता मंगेशकर यांनी म्हटले.

वयाच्या पाचव्या वर्षी लता मंगेशकर पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यांची सुरुवात अभिनयापासून झाली असली, तरी त्यांची आवड फक्त संगीतात होती. १९४२ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्या फक्त १३ वर्षांच्या होत्या. नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांनी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि लता मंगेशकर यांना गायिका आणि अभिनेत्री बनण्यास मदत केली.

लता दींदीचे गाणं म्हणजे नशिबवान शतक

गीतकार गुलजार हे सांगताना म्हणतात, गेल्या शतकातील आपण सगळेजण नशिबवान आहोत कारण, लतादिदींच्या आवाजाला आम्ही जवळून बघितले आहे आणि जवळून ऐकलेही आहे. लता मंगेशकर यांच्यासाठी मला लिहिता आले हे माझ्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट मानतो मी. आम्ही त्यांची गाणी ऐकून कुणी असे नाही म्हणू शकत की, अरे यार क्या कमाल का गाती हे. आणि आपण असं म्हणूही शकत नाही आणि करूही शकत नाही. त्यांचे संगीत आणि गाणं ऐकून अत्युच्च पातळीवरचाच आनंद आपण घेत असतो. त्यांचं गाणं ऐकलं की, त्यांच्याविषयीचा आदर आपोआप आपल्या मनात तयार होतो. त्यांच्या कोणत्याच गाण्यासाठी आपण अपशब्द नाही वापरू शकत नाही. त्यांच्या गाण्यात आणि आवाजात आपल्याला कोणतीच शंका घेता येत नाही. त्यांचे गाणं म्हणजे उत्स्फूर्त आणि आतून आलेल्या प्रार्थनेसारखं आहे, ते नेहमीच आपल्या कानात आणि मनात गुणगुणावे असे वाटते.

लतादीदींचा आवाज कायम चाहत्यांच्या हृदयात राहील : राहुल गांधी

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. लता मंगेशकर यांचा सुमधुर आवाज अजरामर आहे. त्यांचा आवाज चाहत्यांच्या हृदयात कायम राहील, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिली आहे. आपल्या लोकप्रीय आवाजाने त्यांनी चाहत्यांची मने जिंकली असल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांच्या दु:खात मी संवेदना व्यक्त करत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

संगीतविश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न भंगलं : उपमुख्यमंत्री अजित पवार

“‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम, ये मंजिलें हैं कौनसी…? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादीदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादीदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादीदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

“लतादीदी अमर आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच येणार नाही हा भाबडा समज आज खोटा ठरला आहे,” असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीला संगीतकलेचा गौरवशाली वारसा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादीदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादीदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी दिली. संगीतक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवलं. ‘अद्वितीय’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. भारतीय, जागतिक संगीतक्षेत्र समृद्ध केलं. देव आणि स्वर्ग आहेत की नाही ते माहित नाही, परंतु लतादीदींमध्ये अनेकांनी देव पाहिला. त्यांच्या सूरांनी रसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती दिली. लतादीदींनी सामाजिक बांधिलकीही जाणीवपूर्वक जपली.

१९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धात शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेल्या ‘मेरे वतन के लोगो…’ गाण्यानं तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पंडित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. विश्वरत्न, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लतादीदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचं निधन ही महाराष्ट्राची, देशाची फार मोठी हानी आहे. लतादीदींचं नसणं कायम सलत राहील, मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. मी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबियांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

थम गया सुरों का कारवां, लतादीदी म्हणजे संगीतातला पूर्णविराम : भुजबळ

लतादीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी असून, त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. दीदींच्या जाण्याने संगीतातले एक पर्व संपले आहे, अशा भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, लता मंगेशकर म्हणजे संगीतातील पूर्णविराम. त्याच्या गायनाने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील संगीतप्रेमी मंत्रमुग्ध होत असत. म्हणूनच त्यांना संगीतातील गानसरस्वती म्हटले जायचे. आज लतादीदी यांचे निधन झाले असले, तरी संगीताच्या माध्यमातून त्या कायमच अजरामर राहतील. “नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है ग़र साथ रहे… !” लतादीदी यांनी गायलेल्या या गाण्याप्रमाणे आज शरीराने जरी त्या नसल्या तरी त्यांचे स्वर कायम आपल्यात राहतील. लतादीदी यांच्या निधनाने मंगेशकर कुटुंबीयांवर व संगीतप्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मी व माझे कुटुंबीय मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर त्यांच्या मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना देखील भुजबळ यांनी केली.

संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला : कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे. हा दिवस अटळ आहे हे माहिती असून देखील हा दिवस येऊच नये असे वाटत होते. भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते. आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाईगीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शोक व्यक्त केला आहे.

अभिजात भारतीय संगीत सुलभ करून लतादीदींनी ते समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविले. आपल्या दैवी स्वरांनी त्यांनी असंख्य जनसामान्य, शेतकरी तसेच कष्टकरी लोकांना सकारात्मक जीवन जगण्याची नित्यनवी उमेद, ऊर्जा व उत्साह दिला. लतादीदी या तब्बल आठ दशके भारतीय चित्रपट सृष्टीची ओळख होत्या. चित्रपट व संगीत सृष्टीच्या सुवर्ण काळातील साक्षात हिरकणी होत्या. भारतरत्न लतादीदी महाराष्ट्राच्या कन्या होत्या याचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्या आपल्या जीवनकाळात झाल्या हे आपले सद्भाग्य होते. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला आहे. त्यांचा दैवी स्वरदीप मात्र मनामनात तेवतच राहील. या दुःखद प्रसंगी संपूर्ण राज्याच्या वतीने लतादीदींना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना आशाताई, उषाताई, मीनाताई, पं. हृदयनाथ तसेच संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांना कळवतो. लतादीदींच्या देशविदेशातील करोडो चाहत्यांना देखील आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

एक महान पर्व संपले : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लता दीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग, क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.

ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहसंबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील.

लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button