Top Newsराजकारण

शिवतीर्थावरील विद्युत रोषणाईचे दिवे इटलीतून आयात केलेत, हा योगायोग आहे की…?

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा टोला.

मुंबई : मुंबईतील दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि परिसरात कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी याचं लोकार्णणही करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीचा सर्वप्रथम वापर शिवाजी पार्कमध्ये करण्यात आला. उद्यानातील शिवाजी महाराजांचा पुतळ्याबरोबरच परिसरातील रस्ते, पदपथ आणि चौक येथे कायमस्वरूपी रोषणाई करण्यात आली. ही सर्व विद्युत रोषणाई करण्यासाठी दिव्यांसह इतर सर्व साहित्य हे इटली येथून नेरी या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून मागवलं आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटलीमधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटलीचं लांगुलचालन?, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला. मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून विद्युत रोषणाईचा हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. मैदान परिसरातील सर्व रोषणाई स्वयंचलित पद्धतीनं व रंगीबेरंगी कशी संचालित होते, त्याची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली होती.

शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा सन १९६६ मध्ये उभारण्यात आला. या पुतळ्यावर आजपर्यंत कोणतीही विद्युत रोषणाई करण्यात आली नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून सुमारे सव्वा कोटी लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प साकारला आहे. यामध्ये पाच वर्षांचा देखभाल खर्चदेखील समाविष्ट आहे. ही रोषणाई कायमस्वरुपी आहे. तसेच स्वयंचलित व रंग बदलत्या स्वरुपाची आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा सर्व बाजुंनी विद्युत रोषणाईने उजळावा यासाठी रंग बदलणारे एलईडी प्रोजेक्टर दिवे लावण्यात आले आहेत. पुतळ्याच्या चारही बाजुस जळती मशाल भासेल, अशारितीने दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच उद्यानात एलईडी स्पाईक दिवे लावले आहेत. पुतळ्याच्या आजुबाजूच्या पदपथाची शोभा वाढवण्यासाठी ४२ बहुरंगी एलईडी ग्लोब दिवे बसविले आहेत.बेंगाल क्लब परिसरातील धबधबा तसेच झाडांवर रंग बदलणारे एलईडी विद्युत दिवे लावले आहेत. ही सर्व विद्युत रोषणाई करण्यासाठी दिव्यांसह इतर सर्व साहित्य हे इटली येथून नेरी या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून मागविले आहेत. या सर्व साहित्याला आंतरराष्ट्रीय मानांकन आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button