Top Newsराजकारण

छत्रपतींच्या पुतळा विटंबनेचे तीव्र पडसाद, तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध

शिवसेना आक्रमक, तर राष्ट्रवादी राज्यभरात शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालणार

बंगळुरू/मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर सर्व मराठी जनतेमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. कर्नाटकातील या घटनेचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. ठिकठकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांना काळं फासण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे बेळगावतही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे असल्याचं संतापजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. बेळगावात झालेल्या दगडफेकीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवभक्त रस्त्यावर उतरले आणि दगडफेक सुरु केले. बंगळुरुतील एका चौकातील पुतळा आहे. कानडी व्यावसायिकांचे दुकाने बंद करण्यास सांगितले. त्यानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटले.

कानडी फलक फाडले, कर्नाटकच्या वाहनांवर दगडफेक

बंगळुरूजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद सांगली, कोल्हापूरसह अन्य सीमावर्ती जिल्ह्यात उमटले. संतप्त जमावाने कर्नाटकी वाहने व व्यावसायिकांची दुकाने लक्ष्य केली. दरम्यान, या घटनेला क्षुल्लक बाब म्हटल्याबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिरजेत शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील वाहनांवर दगडफेक करीत दोन वाहनांची तोडफोड केली. मिरज पंचायत समिती आवारातील छत्रपतींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केले. याप्रकरणी नऊजणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीयांच्या वतीने निदर्शने करत कर्नाटक सरकारचा निषेध केला. सरकारने कानडी गुंडांवर कारवाई करावी, अन्यथा कर्नाटकची बस महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असाही इशारा दिला.

लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लुंगी फाडून, तर उस्मानाबादमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीने कर्नाटकचा झेंडा जाळून निषेध नोंदविला. कन्नड रक्षक वेदिकेच्या पुतळ्याचेही दहन केले. सोलापुरात शिवप्रेमींनी शिवाजी चौकात एकत्र येत निदर्शने केली. सरकारने कानडी गुंडांवर कारवाई करावी, अन्यथा कर्नाटकची बस महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असाही इशारा संतप्त नागिरकांनी दिला आहे.

छत्रपती संभाजीराजेंकडून निषेध

संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी असं खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदींनी स्वत: लक्ष घालावे : मुख्यमंत्री

शिवरायांचा कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालावे, अशी मागणी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही; अजित पवार संतप्त

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे. पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून मी घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारने या घटनेकडे गांभीर्यानं पहावं, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेनं जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाल्यास कर्नाटक सरकार जबाबदार : एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकून त्यांची विटंबना करण्याचा दुर्दैवी प्रकार बंगळुरू शहरात घडला. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून या प्रकरणातील दोषींना शोधून त्यांना कठोरात कठोर शासन करणे गरजेचे आहे. या घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास तमाम शिवप्रेमी जनतेचा उद्रेक होईल आणि तसे झाल्यास त्यास कर्नाटक सरकारच पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा राज्याचे सीमाभाग समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.

शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसाचे दैवत नसून संपूर्ण हिंदुस्थानातील तमाम शिवप्रेमींचे दैवत आहेत. असे असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी ही घटना क्षुल्लक असल्याचे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शासन होणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर त्यांना शिवप्रेमी जनता आपल्या पद्धतीने अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही.

राष्ट्रवादीकडून शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालणार

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरातील शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घोषणा केलीय.

कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या, दिनांक 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. उद्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील, असं जयंत पाटील यांनी ट्वीटरवरुन जाहीर केलं आहे.

त्या विकृतीचा निषेधच- देवेंद्र फडणवीस

आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत.त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच! ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईलच! असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button