Top Newsराजकारण

मुख्यमंत्र्यांनी माशांचा पाहुणचार घ्यावा आणि परत जावं, विमानतळाचं श्रेय आमचंच : राणे

मुंबई : शिवसेना विरुद्ध नारायण राणे या संघर्षाचा आणखी एक अंक उद्या सिंधुदुर्गात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं उद्घाटन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील उपस्थित राहणार आहेत. राणे यांनी उद्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. चिपी विमानतळाच्या कामात शिवसेनेचा काहीच संबंध नाही. उलट यांच्या नेत्यांनी विमानतळाच्या कामांना विरोध केला, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. विकास प्रकल्पांना आधी विरोध करायचा आणि प्रकल्प पूर्ण झाले की श्रेय घ्यायला यायचं, ही शिवसेना नेत्यांची वृत्ती आहे. राज्याचे मुख्यमंत्री असल्यानं उद्धव ठाकरे यांनी आमच्या सिंधुदुर्गात यावं, आम्ही त्यांचा पाहुणचार करू, मालवणचं म्हावरं खावं आणि परत जावं, असा टोला राणे यांनी लगावला आहे.

नारायण राणे यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्गसाठी आपण काय काय केलं याची जंत्रीच सादर केली. तसेच चिपी विमानतळासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावाही घेतला. चिपी विमानतळाचे सर्व श्रेय भाजप आणि आमचं आहे. त्यात कुणाचंही श्रेय नाही. पाहुणे म्हणून आम्ही बोलावलंय पाहुणे म्हणून या. पदाप्रमाणे काही तरी द्या आणि जा. नाही तर पूर्वी मोठमोठी माणसं कार्यक्रमाला यायची, एक मंत्री आला की मोठमोठे रस्ते व्हायचे. आता एकदोन तीन रस्त्यांचे पैसे तरी द्या. विकासाच्या अनेक गोष्टी आहेत. त्याला पैसे द्या. वादळाच्यावेळी जाहीर केलेले पैसे द्या. पूरपरिस्थितीत जाहीर केलेले पैसे द्या, असं राणे म्हणाले.

विकासाच्या आड कोण येतं ते जनतेला माहीत आहे. सिंधुदुर्गातील जनता त्याची साक्षीदार आहे. उद्घाटनाची परवानगी मी आणली. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन त्यांना उद्घाटनासाठी ८ दिवसांत परवानगी देण्याची विनंती केली. त्यांनी ती तातडीनं मान्य केली आणि ९ ऑक्टोबर तारीख दिली. शिवसेना नेत्यांनी विमानतळासाठी काय केलं, त्यांची औकात काय, असे प्रश्न राणेंनी विचारले.

हप्तेबाज शिवसैनिकांची नावे जाहीर करण्याचा इशारा

नुसतं कावकाव करून काही होत नाही. त्याचा काही उपयोग नसतो. कायदेशीर कामं करावी लागते. सध्या सिंधुदुर्गात अनेक विकासकामं सुरू आहेत. तिथल्या कंत्राटदारांना सर्वाधिक त्रास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होतो. सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदारांनी गाड्या घेतल्या. याला अडवणूक वगैरे म्हणत नाहीत. हा सगळा हप्तेबाजीचा प्रकार आहे, असा घणाघाती आरोप राणेंनी केला. उद्या होणाऱ्या कार्यक्रमात त्या नेत्यांची नावं जाहीर करेन, असंदेखील राणे म्हणाले.

शिवसेनेचं एक योगदान कोकणात दाखवा, त्यांनी केलेलं एक काम मला दाखवा, असं आव्हान नारायण राणे यांनी यावेळी केलं. चिपी विमानतळ केव्हाच बांधून तयार होतं. पण विमानतळाच्या पाण्याचा प्रश्न होता. एमआयडीसीकडे पाणी देण्याचं काम होतं. ते इतकी वर्ष का केलं नाही? चिपी विमानतळाकडे पोहोचणाऱ्या रस्त्याचा खर्च फक्त ३४ कोटी इतका होता. मग तो इतकी वर्ष का केला गेला नाही?, असं सवाल नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केले. रस्त्यांची कामं घेतली आणि प्रत्यक्षात कामं केलीच नाहीत. त्या पैशातून फक्त नव्या नव्या गाड्या नेत्यांनी घेतल्या, असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला.

सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्या होईल. १९९७-९८ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी उड्डाण मंत्री असताना ग्रीनफिल्ड विमानतळांची घोषणा केली. तेव्हा सिंधुदुर्गात विमानतळ व्हावं यासाठी मी त्यांची भेट घेऊन विमानतळ मंजूर करून घेतला. १५ ऑगस्ट २००९ रोजी भूमिपूजन झालं. त्यावेळी तिथे काही जण आंदोलन करत होते. घोषणाबाजी सुरू होती. जमीन संपादित करू नका, आम्हाला विमानतळाची गरज नाही, अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यांचं नेतृत्त्व शिवसेना खासदार विनायक राऊत करत होते. आता तेच विमानतळ आम्ही सुरू केलं म्हणत श्रेय घेत आहेत, असं राणेंनी सांगितलं.

संकुचित मनोवृत्तीमुळे फडणवीसांना निमंत्रण नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही सरकारची संकुचित मनोवृत्ती आहे. हा सरकारी कार्यक्रम आहे. हा काही देसाईंच्या घरचा कार्यक्रम नाही. त्यांच्या मुलाचं लग्न नाही. देवेंद्र सहनशील नेते आहेत. मी त्यांच्या जागी असतो तर चित्रं वेगळं असतं, असं राणे म्हणाले. तसेच मी देवेंद्र फडणवीसांशी या विषयावर चर्चा केली. तेव्हा फडणवीसांनी जनतेच्या हिताचा कार्यक्रम आहे. आंदोलन निदर्शने करू नका, असं सांगितलं. मात्र त्यांना निमंत्रण न देणं, त्यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसणं ही संकुचित मनोवृत्ती आहे, असंही ते म्हणाले.

मी सीनिअर असून माझं नाव बारीक!

माणसाने संकुचित किती असावं बघा. चिपी विमानतळाची कार्यक्रम पत्रिका छापली आहे. त्यात माझं नाव बारीक अक्षरात छापलं आहे. त्यावर शाईही फाटली आहे. शिवाय माझं नावही तिसऱ्या क्रमांकावर टाकलं आहे. मी राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्येही मी दोघांपेक्षा सीनियर आहे. पण ठिक आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांना पहिला मान दिला काही हरकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री कोण आहे हे महत्त्वाचं नाही. माझं नाव बारीक का झालं हे माहीत नाही. ही एक वृत्ती आहे, असं राणे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button