राजकारण

लोकशाही वाचवण्यासाठी देश एकवटल्याशिवाय राहणार नाही: जयंत पाटील

मुंबई: देशात पेगाससद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. देशातील लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे देश एकवटला होता, त्याचप्रमाणे आजही लोकशाही वाचवण्यासाठी, भारतीय संविधानाचा मान राखण्यासाठी संपूर्ण देश एकवटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केला.

जयंत पाटील यांनी आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबई येथील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानाला भेट देऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. याच ऑगस्ट क्रांती मैदानात ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी ‘भारत छोडो’चा नारा देण्यात आला होता आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारून ब्रिटिशांना परतवून लावण्यात आले होते. आजही देशातील सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पेगासससारख्या गोष्टी आणत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे, असे पाटील म्हणाले.

देशवासियांसाठी नऊ ऑगस्ट’ क्रांतीदिनाचं महत्व स्वातंत्र्य दिनाइतकंच आहे. देशावर दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारला १९४२ मध्ये आजच्याच दिवशी ‘चले जाव’ असं निक्षूण सांगण्यात आलं. स्वातंत्र्यासाठी ‘जिंकू किंवा मरु’ची शपथ देशवासियांनी घेतली. मोठे नेते तुरुंगात बंद झाल्यानंतर सामान्य माणसांनी नेतृत्वं हाती घेऊन स्वातंत्र्यलढा पुढे नेला. देशातला सामान्य माणूसही देशहितासाठी त्याग करु शकतो. प्राणांचं बलिदान देऊ शकतो. नेतृत्व करु शकतो, हे ९ ऑगस्टच्या ऐतिहासिक क्रांतीदिनाने सिद्ध केले आहे. कोट्यवधी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य चिरंतन ठेवण्याचा पुनर्निर्धार करुया…, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button