१०३ वर्षीय आजीने घेतली कोरोनाची लस

नवी मुंबई : १०३ वर्षीय श्रीमती जे. कामेश्वरी यांना बंगळुरूमध्ये बाणेरघट्टा रोडवरील अपोलो हॉस्पिटल्समध्ये कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. उपलब्ध आकडेवारीनुसार भारतात कोरोना लस घेणाऱ्या त्या सर्वात वयस्क महिला आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे ७७ वर्षांचे पुत्र प्रसाद राव आणि कुटुंबातील इतर सदस्य देखील अपोलो हॉस्पिटल्समध्ये लस घेण्यासाठी आले होते.
लस घेत असताना संपूर्ण वेळ श्रीमती कामेश्वरी यांनी कर्मचाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केले. लस देण्यात आल्यानंतर ३० मिनिटे त्या सर्वांना देखरेखीखाली ठेवण्यात आले होते आणि त्या कालावधीत श्रीमती कामेश्वरी आणि त्यांच्या कुटुंबातील कोणालाही कोणत्याही प्रकारचा दुष्प्रभाव जाणवला नाही.
अपोलो हॉस्पिटल्स अधिकृत प्रवक्त्याने सांगितले, श्रीमती जे. कामेश्वरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जे साहस आणि धैर्य दाखवले आहे त्याबद्दल आम्हाला त्यांच्याविषयी खूप कौतुक वाटत आहे. खासकरून या वयात लस घेऊन महामारीच्या विरोधात लढण्याची जी हिरिरी त्यांनी दाखवली आहे ती नक्कीच प्रशंसनीय आहे. त्यांनी आपल्या या कृतीमधून इतर सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आदर्श निर्माण केला आहे, यामुळे लसीकरणाविषयीची भीती आणि शंका मनातून काढून टाकून पुढाकार घेण्यात मदत मिळेल. अपोलोमध्ये आम्ही सर्वांना विनंती करतो की, जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे व कोरोना लस घ्यावी कारण कोरोना विषाणूविरोधातील लढाई जिंकण्यासाठी हे एक शक्तिशाली हत्यार आहे.