प्रताप सरनाईक यांची युतीची हाक, भाजपने लगेचच साधली संधी
मुंबई: भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, अशा आशयाचं पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरनाईक जे आता सांगत आहेत, तेच तर आम्ही १८ महिन्यांपूर्वी सांगत होतो. पण तेव्हा तुम्ही ऐकलं नाही, असं पाटील म्हणाले.
भाजपसोबत पुन्हा युती करायला हवी, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे. आता आम्ही याबद्दल आम्ही सकारात्मक बोलल्यास लगेच सामनामध्ये अग्रलेख येईल. सत्ता नसल्यानं यांच्या पोटात दुखत असल्याची टीका होईल. प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनी त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. आता उद्धव ठाकरेंनी विचार करावा. त्यानंतर आमचे वरिष्ठ नेते, नेतृत्व विचार करेल, असं सूचक विधान पाटील यांनी केलं. यावेळी त्यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेची आठवण करून दिली.
अल्पसंख्याकांचं लांगुलचालन मी करणार नाही, हीच बाळासाहेबांची भूमिका होती. या भूमिकेसाठी त्यांनी आयुष्यभर ज्यांच्याविरोधात संघर्ष केला, त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी वेगळी चूल मांडली, अशी टीका पाटलांनी केली.
शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या भूमिकेत आणि कार्यशैलीत खूप मोठा फरक आहे. त्यांची आघाडी अशास्त्रीय असल्याचं देवेंद्र फडणवीस १८ महिन्यांपूर्वीच सांगत होते. पण सत्ता लोहचुंबकासारखी असते. त्यासाठी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली,’ असं पाटील यांनी पुढे म्हटलं. सरनाईक यांच्या घरावर, मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयानं छापे टाकले. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरला आहे का, असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांना युती व्हावी असं मनापासून वाटत असावं. शिवसैनिकांची आणि पक्षाच्या अनेक नेत्यांनादेखील तसं वाटत असावं असं पाटील म्हणाले.