मुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारनं भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास खलबतं झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. पंतप्रधानांसोबत बैठक सुरू असताना राज्यातही घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा सुरू असतानाच राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यात भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचं नेमकं कारण कळू शकलेलं नसलं तरी दिल्लीतील ठाकरे-मोदी भेटीच्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक होत असल्याचं सांगण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, फडणवीसांनी बोलावली बैठक ही पक्षांतर्गत सर्वसाधारण बैठक असून त्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीशी काहीही संबंध नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रामध्ये समन्वयानं चर्चा होत असेल तर याचं आम्हाला चांगलच वाटेल, चिंता करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही दरेकर म्हणाले.