शिक्षण

ठाकरे सरकारचा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ; भाजपची टीका

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या निकालाची प्रक्रिया सुरू असून, अद्याप राज्य मंडळाने निकालाची अधिकृत तारीख प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे निकालाबाबत पसरवल्या जात असलेल्या अफवांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन राज्य मंडळातर्फे करण्यात आले आहे. याच दरम्यान भाजपने बारावीच्या निकालावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “ठाकरे सरकारने न्यायालयाचा अवमान तर केलाच पण लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालविला” असं म्हणत निशाणा साधला आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत आपण किती उदासीन आहोत हेच दाखवून दिले” असं देखील म्हटलं आहे. “ठाकरे सरकारला ना सर्वोच्च न्यायालयाचे तमा ना १२ वीच्या विद्यार्थ्यांची काळजी. सर्वोच्च न्यायालयाने 12वी परीक्षेचा निकाल ३१ जुलैला जाहीर करा असे स्पष्ट केलं होतं. मात्र ते जाहीर न करून सरकारने न्यायालयाचा अवमान तर केलाच पण लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालविला आहे” असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी दिलेली ३१ जुलैची मुदत पाळण्यासाठी आघाडी सरकारने लक्ष केंद्रीत करायला हवे होते. मात्र निकालासाठीची मुदत न पाळून महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत आपण किती उदासीन आहोत हेच दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात अजून स्पष्टीकरणही दिलेले नाही, हे आणखी धक्कादायक आहे” असं देखील उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे राज्य मंडळातर्फे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जात आहे. राज्य मंडळाच्या सूचनेनुसार शाळांनी संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे गुण जमा केले आहेत. आता विभागीय मंडळाकडून प्राप्त गुणांचे संकलन राज्य मंडळकडून केले जात आहे. मंडळाकडून ३१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल, अशी विद्यार्थी व पालकांना अपेक्षा होती. परंतु, निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात बारावीचा निकाल येत्या ७ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल,अशी अफवा विद्यार्थी व पालकांमध्ये परसली आहे. परंतु,या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button