ठाकरे सरकारकडून माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न; फडणवीसांचे टीकास्त्र
मुंबई :मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ मंडळात एकानंतर एक वाद होताना दिसत आहेत. आज सकाळी पोलिसांच्या कडक निर्बंधांमुळे आधी श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब झाला. त्यानंतर पोलिसांनी पत्रकारांना अरेरावी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या प्रकारावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
फडणवीस म्हणाले की, लालबाग परिसरात झालेली घटना अतिशय चुकीची आहे. हे सरकार माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचं काम करत आहे. कधी गुन्हे दाखल करायचे, कधी कुणाला अटक करायची, कुणावर अन्य प्रकारच्या कारवाया करायच्या. सरकारकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच, लालबागचा राजा इथे जास्त गर्दी नव्हती, माध्यमं आपलं काम करत होते. त्यांच्याकडे पासेस होते. अशावेळी त्यांना धक्काबुक्की करत अरेरावीची भाषा वापरणणं योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.
मागील दोन वर्षांपासून राज्यात असे प्रकार सुरू आहेत, याची दखल सरकारने घेतली पाहिजे. इतकी दंडुकेशाही योग्य नाही. अशाप्रकारे दंडुकेशाहीच्या जोरावर जर आपण कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असू तर ते काही योग्य नाही. लालबाग येथे झालेल्या घटनेवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही फडणवीसांनी केली.
लालबाग गणेश मंडळातील लोकांना आणि पत्रकारांना पास देण्यात आले आहे. पण, पास दाखवूनही पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला धक्काबुक्की केली. तसेच, पत्रकारांनी हात लावू नका असे म्हटल्यावर, हात काय, पाय पण लावेन, अशी गुंडगिरीची भाषा वापरली. त्या वृत्त वाहिनीच्या पत्रकाराशिवाय इतर पत्रकारांनाही बॅरिकेडच्या बाहेर काढण्यात आले. यावेळीही निकम यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.