Top Newsशिक्षण

टीईटी परीक्षा गैरव्यवहार; सुखदेव डेरे, अश्विनकुमार, संजय सानपला अटक

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहाराचे लोण दिवसेंदिवस वाढत असून आता ते २०१८ च्या परीक्षेपर्यंत पोहचले आहे. २०१८ मध्ये राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेला व माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचा विभागीय आयुक्त सुखदेव डेरे याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याबरोबरच जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा तत्कालीन संचालक अश्विनकुमार यालाही पोलिसांनी बंगळुरू येथून ताब्यात घेत अटक केली आहे. बीडमधून संजय सानपला बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे टीईटी परीक्षा पेपर गैरव्यवहार प्रकरणी आता अटक केलेल्यांची संख्या ६ झाली आहे.

सुखदेव डेरे हा २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषदेचा आयुक्त होता. २०१८ च्या टीईटी पेपर फोडण्यामध्ये डेरे याचाही हात असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने रात्री त्याला अटक करण्यात आली आहे. डॉ. प्रितीश देशमुख याच्या अगोदर जी ए सॉफ्टवेअरच्या महाराष्ट्राची जबाबदारी अश्विनकुमार याच्याकडे होती. त्याच्याशी संगनमत करुन डेरे व तुकाराम सुपे यांनी परीक्षार्थींकडून एजंटांमार्फत पैसे घेऊन त्यांना पास केल्याचे माहिती समोर आली आहे.

यावरुन जी. ए. सॉफ्टवेअरमध्ये प्रीतीश देशमुख याच्या अगोदरही तेथील संचालक हे वरिष्ठांशी संगनमत साधून परीक्षेमध्ये गैरव्यवहार करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच पुणे पोलिसांनी २०१६ पासून झालेल्या सर्व टीईटी परीक्षांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच हा प्रकार समोर आला.

बीडमधून संजय सानपला बेड्या

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात सायबर पोलिसांनी एकाला बीडमधून अटक केली. संजय शाहूराव सानप (४० रा. वडझरी, ता.पाटोदा, जिल्हा बीड ) याचा या गुन्हयात सहभाग असल्याचे आढळल्याने त्यास अटक करण्यात आलीय.

जीए टेक्नॉलॉजीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमारला अटक

जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आलीय. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय. या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. २०१७ मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता. प्रीतिश देशमुखचा हा वरिष्ठ होता. सुखदेव डेरे हे औरंगाबाद विभागीय बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांना अटक केलीय. या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button