गोवा : गोव्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी गोव्यातील राजकारणाला वेग आला आहे. गोव्यातही महाराष्ट्राप्रमाणेच महाविकास आघाडी करण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोव्यातही हा प्रयोग करण्यात येणार असून उद्या यासंदर्भात दोन्ही पक्षांशी चर्चा करणार असल्याचे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची गोव्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं चर्चा झाली असल्याची बोललं जातंय.
आज गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली. दिनेश गुंडू राव
दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर तसेच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली. pic.twitter.com/FYO629eX2h— Sanjay Raut (@rautsanjay61) January 3, 2022
महाराष्ट्र राज्याप्रमाणे गोव्यातही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी स्थापन करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे निवडणूक प्रभारी संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. आज संध्याकाळी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी त्यांनी बातचीत केली.
काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या दोन पक्षांनी गोव्यात युती केली आहे. त्याच्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आधीच काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात जागा वाटपाचा तिढा सुटला नाही त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची भर पडल्यास हा विषय अधिकच गुंतागुंतीचा होऊ शकतो.