![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/08/prasad-lad-chitra-wagh.jpg)
कोणी म्हणाले, शिवसेना भवन तोडू… कोणी म्हणाले शिवसेना भवन हे कलेक्टर अॅफिस… तर कोणी म्हणतं, पेगासिसची नको तर पेंग्विनची काळजी करा…. तर कोणी नुसतेच वयाने ज्येष्ठ असणारे म्हणतं, सीएम-बीएम कोण फडतूस, मी त्याला मानत नाही, राज्यात मुख्यमंत्री आणि प्रशासनच नाही, राज्य आमच्याकडे द्या… आणखी एकजण म्हणाला, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना…. हे आणि असे बरेच काही… वाचाळवीरांची जंत्री आणि बाष्कळ, मुक्ताफळांचा पाऊस संकटकाळातही रोज नित्यनेमाने ऐकायला, अनुभवायला मिळतोच आहे. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी भाजपच्या माहीम येथील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अगदी तावातावाने थेट शिवसेनाभवन फोडण्याची भाषा केली आणि ते अडचणीत आले. चौफेर टीका सुरु झाल्यानंतर आता ते म्हणतात, मी असे काही म्हणालोच नाही, हे तर माध्यमांचे पाप…बाप रे बाप! बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, वगैरे वगैरे…
बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत एकीकडे नारायण राणे आणि त्यांची मुले आपले महत्व भाजपात वाढवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. बाळासाहेबांप्रती निष्ठा दाखवत त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटूंबावर वाट्टेल त्या भाषेत टीका करण्याची जणू भाजपमध्ये स्पर्धाच लागलेली दिसते. आपण आपली मर्यादा सोडून वागलो तर शिवसैनिकच नाही तर सर्वसामान्य जनता आपल्याला काडीचीही किंमत देणार नाही, हे लक्षात येताच हात जोडून तो मी नव्हेच च्या भूमिकेत शिरायला या वाचाळांना अजिबात वेळ लागत नाही. मुळातच राज्यात सर्वत्र नैसर्गिक आणीबाणी उभी ठाकली आहे. अजूनही महापुराचे संकट टळलेले नाही. राज्यातील एकूण २१ हून अधिक जिल्ह्यांना महापुराचा, अतिवृष्टीचा फटका बसल्याची प्रशासकीय माहिती आहे. अडचणीत सापडलेल्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवून त्यांना मायेचा हात देत उभे करणे अत्यावश्यक आहे. या कठीण परिस्थितीत सर्वच राजकीय पक्षांनी संयमाने, सारासार विचार करून एकी दाखवत सामान्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. पण असे काहीही न करता, केवळ परिस्थितीचा फायदा घेत राज्यातील जनतेत अजून असंतोष पेरायचा, डोकी भडकवणारी भाषा वापरुन जनमन अस्वस्थ करायचे ही भाजपची पारंपरिक खेळी सुरुच आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणात अनपेक्षितपणे आलेले वळण आणि शिवसेनेची कोंडी करण्याच्या नादात, त्यांना चेपवण्याच्या ईर्ष्येपायी भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले. आपण सत्तेत नाही याची खदखद भाजपकडून दर दिवशी जाहीरपणाने व्यक्त होत आली आहे. आता त्याला ठाकरे कुटूबियांची उघड बदनामी करण्याची, एकेरी, शिवराळ, असभ्य भाषा वापरत चिखलफेक करण्याची जोड मिळाली आहे. ठाकरे आणि शिवसेनेवर चिखलफेक केली की आपल्याला भाजपत चांगले स्थान मिळते अशी एक स्पर्धाच सुरु झालेली दिसते. म्हणूनच तर भाजपमधील आयारामांनी शिवसेनेला आपले टार्गेट केले आहे. एकजण चिखलफेक करतो आणि दुसरा साफसफाई करण्याचे नाटक करतो, जसे प्रसाद लाड यांच्या शिवसेना भवन तोडू या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांनी आधी, लाड असे काही म्हणालेच नाहीत असा कांगावा केला. व्हीडीओ पुन्हा एकदा ऐकवल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना, अशी वक्तव्ये आमच्यासारख्या कोणत्याच नेतेमंडळीकडून होऊ नयेत, अशी सारवासारव केली.
भाजपमधील अनेक नेत्यांनी आजवर आपल्या वक्तव्यामुळे जनतेची नाराजी ओढवून घेतली आहे. पण सुधारतील आणि नीतीने वागतील ते नेते कसले? आधी बरळायचे… टाळ्या मिळतात म्हणून आपली लायकी न बघता सभ्यतेची पातळीही सोडायची… अंगावर येते आहे, असे दिसताच घूमजाव करायचे. पलटी मारताना धांदात खोटे बोलून माध्यमांवर खापर फोडायचे आणि पुन्हा त्याच त्याच चुका करायला तयार व्हायचे… सर्वसामान्यांची ‘मेमरी’ तल्लख नसते. ते सगळे विसरुन जातात, अशा मानसिकतेत रोज नवी मुक्ताफळे वाहण्यास हे सिद्ध होतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते अमित शाहा यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे २०१४ पासून भाजपमध्ये चैतन्याचे वारे वाहू लागले. एकहाती सत्ता मिळवत सलग दोनदा भाजपा केंद्रात बादशाह ठरला. मोदी लाटेमुळेच महाराष्ट्रातील काँग्रेससह, राष्ट्रवादी, शिवसनेतील अनेक मातब्बर मंडळी भाजपत दाखल झाली. अर्थात प्रत्येकाला मंत्रिमंडळात स्थान हवे होते, सत्तेत सहभाग हवा होता. कोणी नवऱ्याच्या भ्रष्टाचाराच्या कारवाईपासून मुक्तता हवी म्हणून भाजपचा झेंडा घेतला, तर कोणाला आपल्यावरील ईडीची कारवाई टाळायची होती, म्हणून कोट्यवधींच्या अर्थपूर्ण वाटाघाटी करत भाजपत आले. आयारामाचे पक्षप्रवेश जेव्हा सुरु होते तेव्हा भाजपने अशी मखलाशी केली होती की, जसे असाल तसे पक्षात घेऊ आणि आमच्याप्रमाणेच घडवू. वाल्याचा वाल्मिकी करू. आता आमच्याप्रमाणे म्हणजे भाजपला आपण सुसंस्कृत आहोत असे बहूदा दाखवायचे होते. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. केंद्रातील भाजपच्या अनेक नेत्यांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गुन्ह्याच्या नोंदी आहेत. एकंदरच खोटे बोला पण रेटून बोला ही भाजपची पारंपरिक मानसिकता आता भाजपाला चांगलीच अडचणीची ठरताना दिसते आहे.
भाजपामध्ये आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, आपण मोदी, शाहांचे बगलबच्चे आहोत, आमचे कोण काय वाकडे करु शकते याच गुर्मीतून आता राज्यातील आयारामांना तोंड फुटले आहे. त्यातूनच काल परवा भाजपत आलेल्यांना अजून भाजपाचा इतिहासही धडपणाने अभ्यासता आलेला नाही. अभ्यास, वैचारिकता अन नैतिकता यापासून दूरच असणारे राणे पिता-पुत्रांसह प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, गोपीचंद पडळकर आणि अजून बरेचजण कधी उद्धव ठाकरे तर कधी शरद पवारांवर आपल्या नैतिक मर्यादा सोडून टीका करताना दिसतात. यातल्या बहूतेकांना शरद पवार आणि बाळासाहेबांनी शून्यातून वर आणले आहे. त्याची परतफेड करा आणि गप्प बसा असे कोणीही म्हणत नाही, पण किमान आपली लायकी आणि पायरी ओळखून जिथं गरज आहे, जिथं तुमचा थेट संबध आहे तिथेच नाक खुपसा ना…! भाजपने संपूर्ण राज्याची जबाबदारी तुमच्यापैकी कोणाच्याच खांद्यावर दिलेली नाही. उलट भाजप सध्या आयारामांमध्ये स्पर्धा लावून कुत्र्या मांजराच्या भांडणात बोक्याची भूमिका पार पाडते आहे. मुळातच तुमच्यापैकी किती जणांमुळे भाजपाच विस्तार झाला? भाजपा मोठी झाली? निव्वळ बाष्कळ बडबडीने, निरर्थक हलक्या दर्जाची भाषा वापरण्याने मतदार तुम्हाला पुन्हा सत्तेवर बसवणार आहेत का? चित्राताई, किती पूरग्रस्त महिलांपर्यंत तुम्ही जातीने पोहोचलात? कितीजणांना तुम्ही पदरमोड करुन मदत दिली? प्रसाद लाड तुमची म्हणे हेलिकॉप्टर भाड्याने दिली जातात, पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी किती हेलिकॉप्टरमधून तुम्ही स्वखर्चाने रसद पुरवली? अगदी माजी मुख्यमंत्र्याच्या सौभाग्यवतींनीही एक सामाजिक संस्था आपल्या लेकीच्या नावाने सुरु केली आहे. त्या संस्थेने किती पूरग्रस्त माता भगिनींना आश्रय दिला, मदत केली? सगळेच प्रश्न अनुत्तरीत आहेत.
स्वतःची जागा टिकवण्यासाठी राजकारणात प्रत्येकाला विरोधकांवर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र ही टीका जेव्हा व्यक्तिगत पातळीवर येते तेव्हा तो नेता कार्यकर्त्यांच्या मनातून संपलेला असतो. कारण कार्यकर्त्यांना आणि मतदारांनाही तुमच्या व्यक्तिगत कारणांत फारसा इंटरेस्ट नसतो. ज्यांना भाजपने आणि अनुभवाने मंत्रिपदाची शेवटची संधी मिळाली आहे, ज्यांच्याकडे अजूनही सूज्ञ राजकारणी म्हणून काहीजण बघतात, ज्यांनी आजवर अनुभवलेल्या चढउतारावरुन तरी राजकारणातील सभ्यता किती महत्वाची असते हे लक्षात घ्यायला हवे. राजकारणातील सुसंसकृतपणा शिकवण्यासाठी किमान आयारामांनी भाजपच्याच ज्येष्ठ आणि आदर्शवत अशा अटलजींची संसदेतील भाषणे ऐकावीत. अगदीच जमले तर ज्या नेत्यांमुळे राज्यात भाजप रुजला ते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची विरोधी पक्षातील कामगिरी, भाषणे ऐकावीत, त्याचा अभ्यास करावा. केवळ हव्यासापायी राजकारण कराल तर पुन्हा सत्तेची संधी कधीच तुमच्याजवळ येणार नाही, हे लक्षात घ्या.