फोकस

अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेला सुरुवात

काबुल : अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याला देशाच्या सांस्कृतिक आणि सूचना मंत्रिपदी नियुक्त केलं आहे. याच मुजाहिदनं काल तालिबान्यांकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करुन जगासमोर तालिबानची भूमिका स्पष्ट केली होती.

जबीहुल्लाह मुजाहिद यानं काल माध्यमांसमोर तालिबान्यांची भूमिका स्पष्ट करताना अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार नेमकं कसं असेल याची माहिती दिली होती. यात इस्लामी नियमांचं पालन करुन महिलांच्या अधिकारांचा सन्मान केला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. तसंच आपला विरोध करणाऱ्या सर्वांना माफ केलं असून आमचं आता कुणाहीसोबत शत्रुत्व नाही असंही म्हटलं होतं. तालिबान आता बदलला आहे हेच त्यांनी पत्रकार परिषदेतून जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचीही जबीहुल्लाह यांनी उत्तरं दिली होती. जबीहुल्लाह मुजाहिद गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच कॅमेरासमोर आला होता.

जबीहुल्लाह मुजाहिद यानं पत्रकारांना अतिशय शांतपणे दिलेली उत्तरं पाहून अनेकांना धक्का बसला होता. रक्तपात आणि हिंसक भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या तालिबानचं अचानक शांतीप्रिय स्वरूप पाहून अनेकांना धक्का बसला. ज्या खुर्चीवर अफगाणिस्तान सरकारमधील माहिती व प्रसारण मंत्री पत्रकार परिषद घेत असत त्याच खुर्चीवर बसून मुजाहिद यांनं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली होती.

काबूलमध्ये नागरिकांची धावाधाव, तालिबान्यांचा बेछूट गोळीबार

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर झाली आहे. अफगाणी नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी काबूल विमानतळावर धाव घेतली आहे. अफगाणी महिला, मुलं, युवा आणि प्रौढ नागरिकांनी देश सोडण्यसाठी धावाधाव केली आहे. काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी झाली असून या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तालिबान्यांकडून गोळीबार करण्यात येत आहे. तालिबानमध्ये अफगाणी नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन आणि प्रत्युत्तर देत आहे. यामध्ये अनेक नागरिकांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. काबूल विमानतळावर जमललेल्या गर्दीवर गोळीबार करुन तालिबान्यांनी शांती ठेवण्याच्या नियमाच उल्लंघन केलं आहे.

तालिबान्यांनी आश्वासन दिलं होते की, महिलांचा सम्मान करण्यात येईल मात्र याचे तालिबान्यांनी पालन केलं नाही. काबूल विमानतळावर जमा झालेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यसाठी महिलांवर आणि पुरुषांवर गोळीबार करण्यात आला आहे. काबुल विमानतळावरील व्हिडिओ आणि फोटोमध्ये अफगाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसत आहे. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. काबूलमध्ये प्रचंड गर्दी झाल्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तालिबानी बेछूट गोळीबार करत आहेत. काबुलमधून समोर आलेल्या फोटोत स्पष्ट दिसत आहे की, देश सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला आणि लहान मुलांवर धार असलेल्या शस्त्रांनी वार केले आहेत.

तालिबानविरोधक महिला नेत्या सलीमा माझरी यांना अटक

तालिबानविरोधात हातात शस्त्र घेणाऱ्या महिला नेत्या सलीमा माझरी यांना अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलीमा या अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गव्हर्नर आहेत, ज्यांनी गेल्या काही काळापासून तालिबान्यांच्या विरोधात लढा दिला. तालिबान्यांना रोखण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सलीमा माझरी यांनी स्वतःची सेना तयार केली होती. तालिबान्यांनी बल्ख प्रांतामधून सलीमा यांना ताब्यात घेतलं आहे.

अफगाणिस्तानच्या नवीन राष्ट्रपतींनी अशरफ गनींचा फोटो काढून फेकला

उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला राष्ट्रपती घोषित केलं आहे. सालेह यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावास कार्यालयातून अशरफ गनी यांना फोटो काढून टाकण्यात आला आहे. त्याऐवजी आता अमरुल्ला सालेह यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच, पंचशीरचा वाघ म्हटलं जाणाऱ्या अहमद शाह मसूद यांचाही फोटो दुतावासात लावण्यात आला आहे. सालेह यांच्या या घोषणेमुळे आता तालिबान चांगलाच संतापला असणार आहे. त्यामुळे, तालिबानच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष लागले आहे.

ताजिकिस्तानच्या दुतावासाने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचं खुलं समर्थन केलं आहे. ताजिकिस्तान अफगाणिस्तानकडून त्रस्त होता, आणि सालेह हेही मूळचे ताजिक आहेत. या घोषणेमुळे तालिबानचा पारा चढण्याची शक्यता आहे. अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केल्यानंतर अमरुल्ला सालेह यांनी आपण राष्ट्रपती बनल्याची घोषणा केली. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावरही निशाणा साधला. बायडन यांच्यासोबत चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, असे त्यांनी म्हटलंय.

सालेह यांनी अफगाणी नागरिकांना तालिबानविरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत, पलायन, राजीनामा किंवा मृत्यूनंतर उपराष्ट्रपतींकडे राष्ट्रपतीपदाची जबाबदारी येते, असे अफगाणिस्तानच्या संविधानात लिहिल्याचे सालेह यांनी म्हटले आहे. मी सर्वच नेत्यांशी त्यांच्या समर्थनासाठी संपर्क करणार असल्याचंही सालेह यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

देशाचा खजिना चोरणाऱ्या अशरफ गनींना अटक करा; अफगाण दुतावासाची मागणी

तालिबानचा वाढता प्रभाव पाहून अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला होता. तसंच जाताना त्यांनी आपल्यासोबत चार गाड्याभरून पैसे आणि चॉपर नेल्याचा दावा रशियन दुतावासानं प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानं केला होता. दरम्यान, सध्या अशरफ गनी हे कोणत्या देशात आहेत याची माहिती समोर आलेली नाही. परंत आता ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावासानं इंटरपोलला अशरफ गनी यांना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. दुतावासानं इंटरपोलकडे अशरफ गनी आणि हमदुल्लाह मोहिम, तसंच फजल अहमद फाजली यांना सार्वजनिक संपत्ती चोरण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. तसंच ती संपत्ती अफगाणिस्तानला परत करण्यात यावी असंही म्हटलंय. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं अशरफ गनी यांनी पैशांनी भरलेल्या कार आणि चॉपर घेऊन पलायन केल्याचा दावा केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button