बीडमधील ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन भाजप जिल्हाध्यक्ष मुंबईकडे रवाना
पंकजा मुंडेंसोबत उद्या बैठक
बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांचं राजीनामा सत्र अद्यापही थांबलेले नाही. पंकजा समर्थक आणि बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन थेट मुंबईला रवाना झाले आहेत. उद्या मंगळवारी ते पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मंगळवारी समर्थकांच्या बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानं बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजीचे सूर असून आणखीन राजीनामे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा आशयाचं पत्र भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिलं आहे. ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन जिल्हाध्यक्ष मस्के हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार आहेत. या राजीनामा सत्रावर भाजप प्रदेश कार्यकारिणी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पदांचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या जयश्री मस्के यांचाही समावेश आहे. त्यामुळे राजेंद्र मस्के यांच्याही निर्णयाकडे लक्ष वेधले आहे.
राजेंद्र मस्के यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रं लिहून बीड जिल्ह्याची भावना त्यांच्यापुढे विशद केली आहे. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणं कसं योग्य होतं, याकडेही मस्के यांनी पाटील यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे पाटील या कार्यकर्त्यांची कशी समजूत काढतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. केवळ बीडमधीलच नव्हे तर नगरमधील पंकजा समर्थकांनीही पदांचे राजीनामे दिले आहेत. हे लोण बीड, नगरपर्यंतच मर्यादित असलं तरी लवकरच त्याचे राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंकजा मुंडे सध्या दिल्लीत आहेत. कालच त्यांनी दिल्ली गाठली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत भाग घेतला. त्यानंतर पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी सर्व राष्ट्रीय सचिव आणि नड्डाही उपस्थित होते. पंकजा यांनी उद्या मंगळवारी मुंबईत समर्थकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना पदाचे राजीनामे मागे घेण्याच्या सूचना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.