Top Newsस्पोर्ट्स

टी-२० विश्वचषक : अंतिम फेरीत आज ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्याची उत्सुकता

दुबई: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्याची उत्सुकता खूप शिगेला पोहोचली आहे. पाकिस्तान संघाला शेवटच्या ३ षटकात बाजी पलटवून पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड विरुद्ध महाअंतिम सामना होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघ अत्यंत उत्तम कामगिरी करणारे आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आज दुबईमध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचलं आहे, तर न्यूझीलंडची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नाही.

वेस्ट इंडिजने २ वेळा टी-२० चे विजेतेपद पटकावले आहेत. भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेने प्रत्येकी एकदा ट्रॉफी जिंकली आहे. न्यूझीलंड संघाने सेमीफायनल सामन्यात इंग्लंडवर पाच गडी राखून विजय मिळवला होता. यासोबतच न्यूझीलंडने एकदिवसीय विश्वचषक – २०१९ च्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचा बदलाही घेतला. न्यूझीलंड तीन वर्षांत तिसऱ्यांदा फायनल खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांना जोडणाऱ्या टास्मन समुद्रामुळे उभय देशांतील नागरिकांना ‘ट्रान्स-टास्मन’ असे संबोधले जाते. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या रविवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत हेच ‘ट्रान्स-टास्मन’ संघ दुबईत सत्ता प्रस्थापित करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. नामांकित खेळाडूंचा गाजावाजा न करता मूलभूत खेळाच्या बळावर भरारी घेणारा न्यूझीलंड आणि जागतिक स्पर्धांमध्ये नेहमीच बेधडक वृत्तीसह निर्विवाद वर्चस्व गाजवणारा ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी कोण रविवारी प्रथमच ट्वेन्टी-२० जेतेपदावर नाव कोरणार, याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

कर्णधार केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या इंग्लंडला पराभवाचा धक्का देत प्रथमच अंतिम फेरी गाठली, तर आरोन फिंचच्या ऑस्ट्रेलियन शिलेदारांनी पाकिस्तानवर सरशी साधून २०१० नंतर दुसऱ्यांदा महाअंतिम लढतीतील स्थान पक्के केले.

संघासाठी आतापर्यंत सर्वाधिक २३६ धावा करणारा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानविरुद्ध सामन्याला कलाटणी देणारा मॅथ्यू वेड यांना मोक्याच्या क्षणी सूर गवसल्याने न्यूझीलंडला सावध राहावे लागेल. मात्र फिंच, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल या अनुभवी त्रिमूर्तीला अद्यापही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसवर अतिरिक्त दडपण येत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वाटचालीत मनगटी फिरकीपटू अ‍ॅडम झम्पाने (१२ बळी) सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याला मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड या वेगवान त्रिकुटाची योग्य साथ लाभत आहे. त्याशिवाय उपांत्य लढतीचा सामना दुबईतच खेळल्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना खेळपट्टीचा नूर ओळखणे सोयीचे ठरू शकते.

न्यूझीलंडला जागतिक कसोटी अजिंक्यपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉन्वे हाताच्या दुखापतीमुळे अंतिम लढतीला मुकणार आहे. कॉन्वेच्या माघारीमुळे सलामीवीर डॅरेल मिचेलवरील (१९७) जबाबदारी अधिक वाढली आहे. विल्यम्सन, गप्टिल यांना कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे. अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यात पटाईत असलेला जिमी नीशाम हुकुमी एक्का ठरू शकतो.

ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, अ‍ॅडम मिल्ने या वेगवान त्रयीसह इश सोधी आणि मिचेल सँटनर ही फिरकी जोडी न्यूझीलंडच्या संघाची ताकद आहे. विशेषत: बोल्टने संघासाठी सर्वाधिक ११ बळी मिळवले असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंड २०१५च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा घेण्यासाठी उत्सुक असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button