रांची : कर्णधार रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या विक्रमी शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडला ७ गड्यांनी नमवले. या शानदार विजयासह भारतीय संघाने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. मालिकेतील अखेरचा सामना रविवारी कोलकाता येथे खेळविण्यात येईल.
स्फोटक सुरुवात केलेल्या न्यूझीलंडला २० षटकांत ६ बाद १५३ धावांत रोखल्यानंतर भारताने १७.२ षटकांत ३ बाद १५५ धावा काढत सहज बाजी मारली. राहुलने पहिल्या सामन्यातील अपयश मागे टाकत ४९ चेंडूंत ६५ धावा काढताना ६ चौकार व २ षटकार मारले. कर्णधार रोहितनेही त्याला शानदार साथ देत ३६ चेंडूंत १ चौकार व ५ षटकार ठोकताना ५५ धावा केल्या. दोघांनी ११७ धावांची जबरदस्त सलामी देत भारताचा विजय निश्चित केला. दोघे बाद झाल्यानंतर ॠषभ पंत (१२*) आणि व्यंकटेश अय्यर (१२*) यांनी भारताचा विजय साकारला. न्यूझीलंडकडून तिन्ही बळी कर्णधार टिम साऊदीने घेतले.
त्याआधी, मार्टिन गुप्टिल व डेरिल मिशेल यांनी स्फोटक सुरुवात करून दिल्यानंतरही न्यूझीलंडची वाटचाल मर्यादित धावसंख्येत रोखली गेली. भारतीयांनी पॉवर प्लेनंतर शानदार पुनरागमन करत किवींच्या फटकेबाजीवर अंकुश लावला. आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने २५ धावांत २ बळी घेतले. भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करताना फ्रंटसिटवर बसलेल्या न्यूझीलंडच्या संघाला बॅकफूटवर फेकले. मार्टीन गुप्तीलच्या स्फोटक सुरुवातीनंतर किवींनी पॉवर प्लेमध्ये १ बाद ६४ धावा केल्या होत्या, परंतु त्यापुढील १४ षटकांत त्यांना ५ बाद ८९ धावा करता आल्या. या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या हर्षल पटेलनं सर्वाधिक २ विकेट्स घेत, सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. मार्टीन गुप्तीलनं ज्या आक्रमकतेनं सुरुवात केली, ती पाहता न्यूझीलंड आज धावांचा डोंगर उभा करेल असे वाटले होते. पण, भारतीय गोलंदाजांनी १०व्या षटकानंतर सामन्यावर हळुहळू पकड घेण्यास सुरुवात केली अन् किवींच्या धावांना लगाम लावली.
कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.दव फॅक्टरमुळे या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं अवघड जात होते आणि त्याचाच फायदा पहिल्या षटकापासून मार्टीन गुप्तीलनं उचलला. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकात त्यानं १४ धावा कुटल्या. दीपक चहरनं ५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गुप्तीलला बाऊन्सर टाकून झेलबाद केले. गुप्तील १५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ३१ धावांवर बाद झाला. डॅरील मिचेल ३१ धावांवर सूर्यकुमार यादवच्या हाती झेल देऊन माघारी परतला. अक्षर पटेलनं ४ षटकांत २६ धावा देत १ विकेट घेतली. टीम सेइफर्ट व ग्लेन फिलिप्स यांना धावांचा वेग वाढवता आला नाही. आर अश्विनला रिव्हर्स स्वीप मारण्य़ाच्या प्रयत्नात सेइफर्ट ( १३) झेलबाद झाला. हर्षलनं दुसरी विकेट घेताना फिलिप्सला ३४ धावांवर बाद केले. पॉवर प्लेमध्ये ६४ धावा कुटताना न्यूझीलंडने ८ चौकार व २ षटकार ठोकले. मात्र, यानंतर ७ ते ११ षटकांमध्ये किवींना केवळ एक चौकार मारता आला. आघाडीच्या चार फलंदाजांचा अपवाद वगळता किंवींकडून इतर कोणाला छाप पाडता आली नाही. हर्षलनं २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. किवींना २० षटकांत ६ बाद १५३ धावा करता आल्या.
लोकेश राहुल- रोहित शर्मा जोडीचे पराक्रम
न्यूझीलंडच्या १५४ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाच्या विजयाचा मजबूत पाया रचला. लोकेश-रोहित जोडीनं आजच्या या खेळीनं अनेक पराक्रम नोंदवले, परंतु रोहित शर्मानं पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदी याचा मोठा विक्रम मोडला. प्रत्युत्तरात रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीनं कोणतीच कसर सोडली नाही. या जोडीनं न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सलग पाच सामन्यांत ५०+ भागीदारी करण्याचा भारतीय जोडीचा पहिला मान त्यांनी पटकावला. तर ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारी ही दुसरी भारतीय दोडी ठरली. कॅलेंडर २०२१ वर्षात त्यांची ही पाचवी ५०+ धावांची भागीदारी ठरली आणि त्यांनी शिखर धवन व रोहित शर्मा यांचा २०१८चा विक्रम मोडला. रोहित शर्मानं या सामन्यात ४५० आंतरराष्ट्रीय षटकाराचा विक्रम पूर्ण करताना पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला. रोहितनं ४०४ डावांमध्ये हा पराक्रम केला, तर आफ्रिदीला ४८७ डाव खेळावे लागले. ख्रिस गेल ( ५५३) व आफ्रिदी ( ४७६) यांच्यानंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकारांमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे.