
जयपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यांना सुरुवात झाली असून पहिला टी-२० सामना जयपूरच्या मैदानात नुकताच पार पडला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने ५ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. सामना तसा एका क्षणी भारताच्या पारड्यात झुकल्याचं दिसून येत होतं. पण अखेरच्या काही ओव्हर्समध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत भारताच्या हातातून सामना खेचण्याचा प्रयत्न केला. भारताला अखेरच्या ३ चेंडूत ३ धावांची गरज असताना ऋषभ पंतने चौकार खेचत भारताला विजय मिळवून दिला.
राहुल द्रविड ( मुख्य प्रशिक्षक) व रोहित शर्मा ( फुल टाईम कर्णधार) यांनी नव्या इंनिंगच्या पहिल्याच परिक्षेत विजय मिळवला. न्यूझीलंडनं तगडं आव्हान उभं करूनही रोहित व सूर्यकुमार यादव यांनी दमदार खेळ केला. रोहितच्या हुकलेल्या अर्धशतकाची भरपाई सूर्यकुमारनं टोलेजंगी फटकेबाजीनं केली. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या दोन षटकांत केवळ १२ धावा दिल्या आणि किवी गोलंदाजांना लक्ष्याचा बचाव करण्यासाठी अखेरच्या २ षटकांत १६ धावा करण्यापासून भारताला रोखायचे होते. टीम साऊदीनं १९व्या षटकात विकेट घेत सामन्यातील चुरस आणखी वाढवली. पदार्पणवीर वेंकटेश अय्यरनं बिनधास्त खेळ करताना चौकार खेचला, पण पुढच्याच चेंडूवर विकेटही देऊन बसला. रिषभ पंतनं चौकार खेचून टीम इंडियाला थरारक विजय मिळवून दिला.
मार्क चॅपमॅन व मार्टीन गुप्टील यांची शतकी भागीदारी आणि वैयक्तिक अर्धशतकी खेळीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांची वाईट अवस्था केली. या सामन्यात चॅपमॅननं वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला. दोन देशांकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला. हाँगकाँगकडून खेळताना २०१५मध्ये त्यानं ओमानविरुद्ध नाबाद ६३ धावा केल्या होत्या आणि आज न्यूझीलंडकडून खेळताना भारताविरुद्ध ६३ धावांची खेळी केली. पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरील मिचेल (०) याचा त्रिफळा उडवला. पण, चॅपमॅन व मार्टीन गुप्तील यांनी चांगली फटकेबाजी केली.
चॅपमॅन ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ६३ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्याच षटकात ग्लेन फिलिप्सलाही ( ०) अश्विननं पायचीत केलं. यावेळी फिलिप्सनं घेतलेला डीआरएस वाया गेला. अश्विननं त्याच्या वाट्याच्या चार षटकांत २३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. गुप्टीलनं १५व्या षटकात सिराजला खणखणीत षटकार खेचताना अर्धशतक पूर्ण केलं. १८ व्या षटकात त्यानं चहरनं टाकलेला चेंडू ९८ मीटर लांब भिरकावला. पुढचा चेंडूही तसाच टोलवण्याच्या प्रयत्नात गुप्तील झेलबाद झाला. त्यानं ४२ चेंडूंत ३ चौकार ४ षटकारासह ७० धावा केल्या. चहरनं ४ षटकांत सर्वाधिक ४२ धावा देत १ विकेट घेतली. न्यूझीलंडनं २० षटकांत ६ बाद १६४ धावा केल्या. सिराजनंही ४ षटकांत ३९ धावा देत १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरात रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी वादळी सुरुवात केली. या दोघांनी पाच षटकांत धावफलकावर अर्धशतकी आकडा चढवला. रोहितच्या सुरेख फटक्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. मिचेल सँटनरनं टीम इंडियाला पहिला धक्का देताना लोकेशला १५ धावांवर बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला सूर्यकुमार यादव आणि रोहित ही मुंबईकर जोडी तुफान खेळली. किवी गोलंदाजांवर प्रहार करताना या जोडीनंही अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहितचे अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकले. तो ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४८ धावांवर बाद झाला. पण, सूर्यानं ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून प्रेक्षकांनी वाहवान मिळवली. ल्युकी फर्ग्युसनला नटराजन षटकार खेचून हे अर्धशतक पूर्ण केले.
सामना रंगात आला असताना किवी खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणाच मोठ्या चुका झाल्या. ट्रेंट बोल्टनं सूर्यकुमारचा सोपा झेल सोडलाच, शिवाय चौकारही दिला. त्यामुळे टीम साऊदीचा पारा चढला. पण, बोल्टनंच ही विकेट मिळवून देताना सूर्यकुमारचा त्रिफळा उडवला. सूर्यकुमारनं ४० चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६२ धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत ही नवी जोडी खेळपट्टीवर होती आणि त्यांच्यावर दडपण निर्माण करण्यात किवी गोलंदाजांनी यश मिळवले होते. १२ चेंडूंत १६ धावा टीम इंडियाला बनवायच्या होत्या आणि टीम साऊदीनं १९व्या षटकात ६ धावा देताना एक विकेट घेतली. आता भारताला अखेरच्या षटकांत १० धावांची गरज होती. दोन्ही डावखुरे फलंदाज खेळपट्टीवर असल्यामुळे किवींनी डॅरील मिचेलला पाचारण केलं. वेंकटेश अय्यरनं चौकार मारून दडपण हलकं केलं, परंतु पुढील चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. ४ चेंडूत ५ धावा हव्या असताना मिचेलनं वाईड टाकला. त्यानंतर ३ चेंडूंत ३ धावा हव्या असताना रिषभनं चौकार खेचून भारताचा विजय पक्का केला आणि भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. भारतानं ५ विकेट्स राखून बाजी मारली. रिषभ १७ धावांवर नाबाद राहिला.
जेमिसनची माघार
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसन याने भारताविरुद्ध कसोटी मालिकेवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून माघार घेतली. कसोटी मालिकेला २५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. कर्णधार केन विलियम्सनसोबतच जेमिसनला कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी दिली. व्यस्त वेळापत्रकात खेळाडूंवरील कामाच्या ओझ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यामुळेच आम्ही कसोटी मालिकेला झुकते माप देण्याचे ठरविले आहे, असे स्टीड यांनी सांगितले.




