
मुंबई : मुंबई पोलिसांच्या वकील सुधा द्विवेदी यांनी एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडेंसह अन्य पाच जणांविरोधात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कथितरित्या जबरदस्तीने वसुली करण्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
वकील सुधा द्विवेदी यांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात आणि संयुक्त पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे तसेच राज्य भ्रष्टाचार निर्मूलन ब्युरो यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. समीर वानखेडे, प्रभाकर साईल, के.पी. गोसावी सह पाच जणांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. एका अन्य अधिकाऱ्याने म्हटले की आम्हाला तक्रार मिळाली आहे. मात्र, अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.
ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांचीही मागणी
ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवीत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह सहाजणांवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ॲड. कनिष्क जयंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १६ ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात के. पी. गोसावी, मनीष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतीक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. या लोकांनी संघटितपणे एकत्र येऊन कट कारस्थान करून आर्यन खानचे अपहरण केले. त्याच्या वडिलांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.
या सर्व प्रकरणात वानखेडे यांची भूमिका महत्त्वाची आहे. या पाचही लोकांना वानखेडे यांनी खंडणी उकळण्यास आणि अपहरण करण्यास पाठबळ दिल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह माता रमाबाई पोलीस ठाणे, यलोगेट पोलीस ठाण्यातही तक्रार अर्ज दिला आहे.