
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत नाराज असलेले रामदास कदम यांनी अखेर आज पत्रकार परिषद घेत मनातील खदखद व्यक्त केली आहे. अनिल परब यांच्या विरोधात बोललं की पक्षाच्या विरोधात बोललं अशी परिस्थिती आता झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख नेमकं कोण आहेत? उद्धव ठाकरे की अनिल परब?, असा सवाल उपस्थित करत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. अनिल परब कोकणात शिवसेनेचं अस्तित्त्व संपवण्याचं काम करत असून ते खरे गद्दार आहेत, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.कदमांच्या आरोपांबाबत अनिल परब यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी सावध पवित्रा घेत कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे, तर कदम यांच्या आरोपाला शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप त्यांनी कोर्टात जाऊन खोट्या आहेत हे सिद्ध करून दाखवावे, असं खुले आव्हानही सूर्यकांत दळवी यांनी कदम यांना दिलं आहे.
रामदास कदम यांनी यावेळी अनिल परब यांच्यावर चहुबाजूंनी टीका करत त्यांच्यावर जोरदार आरोप केले. अनिल परब कोकणात शिवसेनेला संपवण्याचं काम करत आहेत आणि तेच खरे गद्दार आहेत. शिवसेनेचा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घालण्याचं काम अनिल परब यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप कदम यांनी यावेळी केला. अनिल परब हे दापोलीत मनसे कार्यकर्त्यांसाठी महात्मा गांधी बनले आहेत. मला गद्दार ठरवण्यासाठी अनिल परबांकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्यावेळी शिवाजी पार्कात माझ्याविरोधात घोषणाबाजी झाली त्याचं मला खूप वाईट वाटलं. त्यामागे कोण होतं हे कळालं पाहिजे, असंही रामदास कदम म्हणाले.
अनिल परब हे शिवसेनेला गहाण ठेवण्याचं काम करत आहेत. मला आणि मुलाला तिकीट मिळू नये म्हणून परब सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मला कोणतंही मंत्रिपद नकोय. मी तर दोन वर्षांपूर्वीच राजकाराणातून निवृत्तीची घोषणा केलीय. मग माझ्या नाराजीचा विषय येतोच कुठून? पण अनिल परब यांच्या अरेरावीपणाचा माझ्या मतदार संघात माझ्या मुलाला त्रास होतो आहे. याचं दु:ख मला आहे, असं रामदास कदम म्हणाले.
मंत्रिपदांबाबत मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्याशी शिवसेना भवनात बोललो होतो. मी, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई आता ज्येष्ठ झालो आहोत. त्यामुळे आम्हाला मंत्रिपदं न देता नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असं मी स्वत: उद्धवजींना सांगितलं होतं. मला मंत्रिपद मिळालं नाही याचं अजिबात दु:ख नाही. पण यादीत पहिलं नाव सुभाष देसाईंचं होतं. नव्या चेहऱ्यांना संधी का मिळाली नाही असा प्रश्न मला पडला, असं रामदास कदम म्हणाले.
शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की…
रामदास कदम आणि किरीट सोमय्या यांच्यात चर्चा झाली असून अनिल परबांविरोधात कटकारस्थान रचलं जात असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असल्याच्या मुद्द्यावर देखील कदम यांनी स्पष्टीकरण दिलं. “मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की माझं कधीच किरीट सोमय्या यांच्याशी चर्चा झालेली नाही. अनिल परब यांचं हॉटेल ही काही शिवसेनेची मालमत्ता नाही. मिलिंद नार्वेकरांनी अनधिकृत बांधकाम स्वत: तोडलं. मग अनिल परबांची अनधिकृत मालमत्ता काय शिवसेनेची मालमत्ता आहे का? त्याविरोधात बोललं तर काय चुकीचं केलं?, असं रामदास कदम म्हणाले.
अनिल परब कोकणचे पालकमंत्री आहेत. पण ते २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट शिवाय इतर कधीच इथं येत नाहीत. अनिल परब यांच्यात हिंमत असेल तर त्यांना वांद्र्यातून साधं नगरसेवकची निवडणूक लढवून निवडून येऊन दाखवावं. तुम्ही स्वत:ला उद्धव ठाकरेंचे जवळचे समजता पण अनिल परब साधं निवडून येऊ शकत नाहीत, असं रामदास कदम म्हणाले.
अनिल परब यांची सावध प्रतिक्रिया
अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या आरोपांवर सावध पवित्रा घेत कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. मला रामदास कदमांच्या आरोपांवर काहीही बोलायचं नाही. ते शिवसेनेचे नेते आहेत आणि पक्ष त्यावर बोलेल. मी काहीही बोलू इच्छित नाही, असं म्हणत अनिल परब यांनी बोलणं टाळलं आहे.
सर्वात मोठे गद्दार रामदास कदमच; सूर्यकांत दळवींचा घणाघात
रामदास कदम यांनी पालकमंत्री अनिल परब व माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. या टीकेला सडेतोड उत्तर देताना दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर तोफ डागली आहे. रामदास कदम यांनी आजपर्यंत अनेकवेळा पक्षाशी गद्दारी केली आहे. ते शिवसेनेविरोधी वागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेत सर्वात मोठे गद्दार असल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी केला.
ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते. मात्र पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे ते पक्षातच थांबले. कदम यांनी वारंवार शिवसेना विरोधात गद्दारी केली होती. त्याचे अनेक उदाहरणे आपण देऊ शकतो. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांनीच आपल्याला पाडले. लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्याविरोधात कपबशीचा प्रचार सुद्धा कदम यांनी केला होता. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना संपविण्याचे काम वारंवार रामदास कदम यांनी केला असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला. रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप त्यांनी कोर्टात जाऊन खोट्या आहेत हे सिद्ध करून दाखवावे, असं खुले आव्हानही दळवी यांनी कदम यांना दिलं आहे.
कदम यांचे आरोप नैराश्यातून : खेडेकर
मनसेचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनीही कदम यांच्यावर टीका केली आहे. रामदास कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप नैराश्यातून आहेत. माझे महात्मा गांधी एकच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. किरीट सोमय्या यांना हाताशी धरून मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचे काम रामदास कदम यांनी केलंय. कोकणावर नैसर्गिक संकटे आली त्यावेळेस रामदास कदम कुठे होते? मातोश्री किंवा शिवसेनेचा आदेशही ते पाळत नाहीत. ही तर त्यांची कदम सेना आहे, असा टोलाही खेडेकर यांनी लगावला.