कोविड लढ्यात राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना आवरा : मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही; मोदींचं स्पष्टीकरण

मुंबई : संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही हे ठामपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये म्हणून सांगावे अशी आग्रही मागणी केली.
राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत असा विश्वास देताना लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सीजन तसेच व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत महाराष्ट्राची बाजू जोरदारपणे मांडली.
महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने आजच्या सादरीकरणात सांगितले. राज्यात एकूण चाचण्यात ७१ टक्के आरटीपीसीआर आणि २८ टक्के एंटिजेन होतात जे की समाधानकरक असले तरी वाढवावे असे केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्ष सव्वा वर्षांपासून आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कोविडची लढाई लढतो आहोत. मधल्या काळात तर संसर्गाची लाट थोपविण्यात आपल्याला यशही आले होते. महाराष्ट्रात तर आधीच ते तीन हजार रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्राने देखील काळजी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ यांच्या आयोजनाने साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा उद्रेक सुरू झाला व कुटुंबच्या कुटुंब संसर्गग्रस्त झाली. राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. इतर जगातही असेच होत होते. त्यामूळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना आरटीपीसीआर चाचण्या 70 टक्यांपेक्षा जास्त करुत व लसीकरण आणखी जास्त गतीने वाढवू असे सांगितले. मात्र त्यासाठी त्यांनी केंद्राचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले की, प्राधान्यक्रम गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी दर आठवड्यात ४० लाख लसींचा पुरवठा करावा. आत्तापर्यंत राज्याला १ कोटी ६ लाख २३ हजार ५०० डोसेस मिळाले आहेत. आजपर्यंत ९२ ते ९५ लाख डोस देण्यात आले आहेत. आता या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून काही केंद्रे बंद पडली आहेत. १५ एप्रिलनंतर १७.४३ लाख डोसेस देण्यात येतील असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले मात्र त्यामुळे लसीकरण मोहिमेत खंड पडेल. त्यामूळे आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावे. २५ वर्षापुढील सर्वाना लसीकरण गरजेचे आहे या मागणीचा पुनरुचार देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.
ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा
राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा. आताची कोविड बाधित रुग्णांची संख्या पहाता १७००-२५०० मे.टन इतक्या ऑक्सीजनची एप्रिल अखेरपर्यतची मागणी असेल. त्यामुळे पुरवठा सुरळित राहण्यासाठी महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा होणे ही अत्यंत निकडीची आणि अत्यावश्यक स्वरूपाची गरज आहे.
रेमडिसीवीर उपलब्धता
देशभरातील औषध उत्पादकांकडून रेमडीसीव्हीरचा पुरवठा व्हावा. या औषधाच्या किंमतीवर ड्रग कंट्रोलरचे नियंत्रण असावे. महाराष्ट्रामध्ये आजघडीस रेमडिसीवीरच्या साधारणत 50 ते 60 हजार बाटल्यांचा वापर सुरु आहे. सक्रिय रुग्णांची संख्या लक्षात घेता ही एप्रिल अखेरपर्यंत ही गरज प्रति दिन ९० हजार ते १ लाख बाटल्या याप्रमाणे वाढू शकते. अनेक ठिकाणी केवळ सिटी स्कॅन केलेल्या रुग्णाला रेमडिसीवीर दिले जाते. आयसीएमआरला ही रेमडिसीवीरचा हा अति व गैरवापर होऊ नये म्हणून त्याच्या वापराचा प्रोटोकॉल निश्चित करण्याची विनंती आहे. रेमडिसीवीरची निर्यातही थांबवावी.
व्हेंटीलेटर्स द्यावेत
केंद्राने जादा 1200 व्हेंटीलेटर्स द्यावेत तसेच जे पाठवले आहेत ते सध्या तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. त्या सुरु करण्यासाठी तंत्रज्ञ द्या, ऑपरेशनल करून द्यावे.
हाफकिनला लस उत्पादन परवानगी मिळावी
हाफिकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. परेल येथे कोव्हॅक्सिनचे उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला आहे. तो लवकर मान्य झाल्यास तंत्रज्ञान हस्तांतर प्रक्रियेने दरवर्षी 228 दशलक्ष डोस तयार करण्यात येतील व लसीकरण मोहिमेला वेग येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही; मोदींचं स्पष्टीकरण
देशभरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्री मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. कोरोना नियंत्रणासाठी आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही, असं मत मोदींनी व्यक्त केलंय
पंतप्रधान मोदींनी देशातील मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत वाढत्या कोरोना रुग्णांची स्थिती आणि लसीकरणावर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही. आता पुन्हा एकदा आव्हानात्मक स्थिती तयार झालीय. काही राज्यांमध्ये हे आव्हान वाढलंय. आपल्याला गव्हर्नंसवर भर द्यावा लागेल.देशाने पहिल्या लाटेच्या टोकाला पार केलंय. यावेळचा कोरोना संसर्ग पहिल्या लाटेपेक्षा अधिक आहे. आपल्या सर्वांसाठी हा चिंतेचा विषय आहे. यावेळी लोक पहिल्यापेक्षा अधिक सामान्य झालेत. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा युद्धपातळीवर काम करावं लागेल. लोकांच्या सहभागातून आपले डॉक्टर परिस्थिती सांभाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जगभरात नाईट कर्फ्युला मान्यता देण्यात आलीय. त्यालाच आपल्याला कोरोना कर्फ्यू नाव द्यावं लागणार आहे, असंही मोदींनी नमूद केलं.
मोदी म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर द्यावा लागणार आहे. यावेळी कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे सर्व उपकरणं उपलब्ध आहेत. आता तर कोरोनाची लसही आहे. मात्र, पहिल्यापेक्षा यावेळी लोक अधिक निष्काळजी झाले आहेत.