
नवी दिल्ली : एनडीपीएस सुधारणा विधेयक २०२१ सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. या चर्चेत भाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरुन केंद्र सरकारला सुनावलं. कोणताही अधिकारी पदाचा गैरवापर करत असल्यास खपवून घेणार नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. याशिवाय, त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींची होणारी एनसीबी चौकशी यावर देखील भाष्य केलं.
वायएसआरपीचे खासदार गुरुमूर्ती यांनी दिलेल्या डेटानुसार ड्रग सगळीकडेच सापडत आहेत. मग फक्त महाराष्ट्र आणि बॉलिवूड टार्गेट का होत आहे? बॉलिवूड सोडून अतर कोणत्याच क्षेत्रात ड्रग अॅडीक्ट नाही आहेत का? ज्या क्षेत्राचं योगदान मोठ्या प्रमाणात आहेत, अशांसोबत मीडिया ट्रायल होणं दुर्दैवी आहे. बॉलिवूड अशी इंडस्ट्री आहे, जी कोट्यवधींना रोजगार देते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ओळख बॉलिवूडमुळेही आहे.
सरकारची धोरणं, संदेश देण्यासाठी मोदी सरकार बॉलिवूड सेलिब्रिटीजचाच वापर करतं. मग बॉलिवूड वाईट कसं? कोणत्याही पुराव्याविना बॉलिवूड सेलिब्रिटीवर केसेस होत आहेत. तरुण कलाकारांनाही एनसीबीमध्ये चौकशीसाठी बोलावलं जात आहे. तीन दिवस या गोष्टी मीडियामध्ये दिसतात, नंतर त्याचं काय होतं? जे अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत, त्यांच्यावर काय कारवाई होते?
महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावयाला ९ महिने तुरुंगात ठेवलं. ज्या वरुन कारवाई झाली तो गांजा नव्हता, तंबाखू निघाला. जेव्हा अटक होते, तेव्हा सगळी प्रक्रिया पाळली जाते का? गांजा आणि तंबाखूमधला फरक कळत नाही? लोकांना अटक करता? जर त्या केसेस चुकीच्या असतील तर त्याची जबाबदारी कुणाची? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केला.
कोणत्याही अधिकाऱ्याकडून त्याच्या पदाचा गैरवापर होत असेल तर हा अन्याय खपवून घेणार नाही. कोणत्याही अधिकाऱ्याकडून त्याच्या पदाचा गैरवापर होऊ नये तोच या नव्या विधेयकाचा गाभा असला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अधिकारी पदाचा वापर करुन ड्रग्ज प्लांट करणं, अटक करणं, सेल्फी घेणं, ठराविक माहितीच बाहेर काढणं योग्य नाही. ड्रग्जविरोधातच लढायचं आहे तर मोठी ड्रग रॅकेट पकडा, लहानांना का पकडता? असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अनेक केसेस अशा आहेत, ज्यात अटक केलेल्या व्यक्तीची टेस्टही होत नाही की त्याने ड्रग घेतलेले की नाही. ड्रग मिळालेलं नसतानाही ३० दिवस तुरुंगात ठेवलं जातं, असं म्हणत आर्यन खान प्रकरणावरुन एनसीबीवर निशाणा साधला. हे अधिकार देतोय आपण त्या अधिकाऱ्यांना जे त्याचा राजकीयदृष्ट्या गैरवापर करतात, ब्लॅकमेल करतात, अशा अधिकाऱ्यांकडून लाखो कोट्यवधींची मागणी होते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.