Top Newsराजकारण

परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; ९ मार्चपर्यंत चौकशीला स्थगिती

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या त्यांच्या चौकशीला ९ मार्चपर्यंत स्थगिती देत त्यांना दिलासा दिला. तसेच त्यांच्या अटकेच्या कारवाईवरील स्थगितीही कायम ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करीत त्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्यांच्यावरही हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला आणि ते स्वतःही कायदेशीर संकटात सापडले.

परमबीर सिंग यांच्यावरही हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे सिंग हे कायदेशीर संकटात सापडले. हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून काढून घेत सीबीआयकडे सोपवायचे की नाही, याचा पैâसला सर्वोच्च न्यायालय ९ मार्चच्या सुनावणीवेळी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तोपर्यंत परमबीर सिंग यांच्यावरील कारवाई टळली आहे. परमबीर यांना मार्च २०२१ मध्ये अँटेलिया स्फोटके प्रकरणात मुंबई पोलिस आयुक्त पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.

न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने परमबीर सिंग यांना दिलासा दिला आहे. याचवेळी खंडपीठाने महाराष्ट्र सरकार आणि परमबीर सिंग यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईमुळे उघडकीस आलेल्या गोंधळाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. राज्य प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवरील लोकांचा विश्वास डळमळीत करण्याची प्रवृत्ती ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र कायद्याची योग्य प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. परमबीर सिंग यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयकडे सोपवायचा की नाही याचा विचार करू, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

न्यायालयात परमबीर सिंग यांच्या वतीने ज्येष्ठ वकील पुनीत बाली यांनी बाजू मांडली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना निष्कारण लक्ष्य केले जात आहे. मूळात या प्रकरणात राज्य सरकार तपास अयशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा युक्तीवाद अ‍ॅड. बाली यांनी आजच्या सुनावणीवेळी केला. परमबीर सिंग यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि खंडणीच्या आरोपाखाली खटले दाखल करण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणांच्या तपासासाठी सीबीआयचे मत मागवले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात परमबीर सिंग यांच्या अटकेच्या आदेशालाही स्थगिती दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button