रिषभ पंत भारतीय क्रिकेट संघाचा भविष्यातील कर्णधार; गावस्करांची भविष्यवाणी

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही महिन्यांत तरुण आणि नवोदित खेळाडूंच्या जोरावर यश संपादन केलं आहे. या खेळाडूंनी संधी मिळेल तशी त्यांची त्यांची जबाबदारी अतिशय व्यवस्थित सांभाळली आणि संघाला विजय मिळवून दिले. याच खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत. हा फक्त खेळाडू म्हणूनच सर्वोत्तम नाही तर त्याने कॅप्टन्सीमध्येही आपला जलवा दाखवलाय. नुकतंच आयपीएलचं १४ वं पर्व पार पाडलं. यामध्ये रिषभने दिल्ली कॅपिटल्सची यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. रिषभच्या कामगिरीवर भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर खूश झाले आहेत. त्यांनी रिषभ भारताचं उद्याचं भविष्य असेल तसंच तो सर्वोत्तम कर्णधारांपैकी टॉपचा कर्णधार असेल, अशी भविष्यवाणी केली आहे.
उद्याच्या काळात रिषभ पंत भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करेल. गावस्कर यांनी एक लेख लिहिलाय. या लेखात ‘ये चिंगारी आग लगा सकती हैं’, असं रिषभ पंतचं वर्णन त्यांनी केलंय. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमध्ये कमाल केली. सहाव्या सामन्यापर्यंत रिषभला कर्णधारपदावरुन प्रत्येक मॅच प्रेझेंटर प्रश्न विचारायचा, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊन रिषभ थकला होता. पण रिषभच्या खांद्यावर ऐनवेळी जबाबदारी देऊनही त्याने सर्वोत्तम कामगिरी केली. या चेहरा भारताचं भविष्य असेल, अशी तोंडभरुन स्तुती गावस्कर यांनी केली आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत त्यांनाच आस्मान दाखवणयाची अद्वितीय कामगिरी केली. या विजयाने भारताचा डंका जगात वाजला. पण हा विजय मिळवण्यात रिषभ पंतचा मोलाचा वाटा राहिला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत देखील रिषभने शानदार परफॉर्मन्स केला तसंच त्याने विकेट कीपिंगमध्येही सुधारणा केल्या. याच कारणामुळे टी-२० आणि वन डे क्रिकेटमध्ये त्याचं पुनरागमन झालं. आयपीएलमध्ये दिल्लीचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर जेव्हा दुखापतग्रस्त झाला तेव्हा धवन, रहाणे, स्मिथ या दिग्गजांना पछाडत त्याने दिल्लीचं कर्णधारपद मिळवलं आणि केवळ मिळवलंच नाही तर आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडूनही दाखवली.
आपल्या चुका दुरुस्त करुन वेगात पुढे जाण्याचं कसब रिषभजवळ आहे. मागील काळात त्याने ते कसब संपूर्ण जगाला दाखवून दिलंय. कर्णधार चुका करतात, तशा चुका रिषभही करेल पण तो चुकांमधून शिकत जाईल आणि एक दिवस भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये रिषभचं नाव असेल, असं गावस्कर म्हणाले.