राजकारण

कवडीमोल किंमतीला घेतलेल्या साखर कारखान्यांची चौकशी होणार : चंद्रकांत पाटील

पुणे : जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाई ही तर सुरुवात आहे, राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कवडीमोल किंमतीला ताब्यात घेतलेल्या सर्व साखर कारखान्यांची आणि सुतगिरण्यांची चौकशी तपास यंत्रणांच्या रडारवर आहे, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केलं.

राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळे सहकारी साखर कारखाने तोट्यात दाखवून ते जप्त करायचे. नंतर त्यांचा लिलाव करायचा आणि दोनशे कोटीची संपत्ती पंधरा कोटीत खरेदी करायची. त्यावर पुन्हा तीनशे कोटीचे कर्ज घ्यायचे अशा पद्धतीचा गैरव्यवहार राज्यात झाला आहे. अशा सर्व २४ साखर कारखान्यांची खरेदी सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या रडारवर आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर त्याच्या व्यवहारांची कागदपत्रे उघड झाली आहेत. जरंडेश्वर हे या गैरव्यवहाराच्या बाबतीत हिमनगाचे टोक आहे. यादी मोठी आहे आणि सर्व रडारवर आहेत, असं पाटील म्हणाले.

सहकारी साखर कारखान्यांची शेकडो कोटींची संपत्ती कवडीमोलाने हडपण्याच्या प्रकाराची चौकशी होण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दाद मागणार असल्याचं ते म्हणाले. राजकीय दबावासाठी कारवाई केल्याचा आरोप त्यांनी नाकारला. कारवाईबद्दल तक्रार करणाऱ्यांनी आधी काही गैरव्यवहार झाला हे तरी मान्य करावे. सध्याच्या काळात चूक करणाऱ्या प्रत्येकाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं पाटील यांनी नमूद केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button