नवी दिल्ली : आताच्या घडीला तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या एकेक भागावर ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. तालिबान अफगाणिस्तानात पाय पसरत असून, काही जणांच्या मते देशातील ६० टक्के भूप्रदेश त्यांच्या अमलाखाली आला आहे. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये मुसंडी मारुन दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार, हेल्मंडसह आणखी चार शहरे ताब्यात घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानने भारतालाही धमकी वजा इशारा दिला आहे. यावरून भाजप खासदाराने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर निशाणा साधला असून, ते भारताची माफी मागतील का, अशी विचारणा केली आहे.
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या कार्यशैली आणि भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदी सरकारला घरचा अहेर दिल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शेजारील देशांशी भारताचे संबंध बिघडल्याची टीकाही स्वामी यांनी केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अडचणीत आणणारे जयशंकर आणि डोवाल हे दोघे कधीतरी देशाची मागणी मागतील का? मोदी समवयस्क राजकारण्यांवर विश्वास न ठेवता, अशा राजकारण्यांवर विश्वास ठेवत असल्याने त्यांना मुक्तपणे निर्णय घेण्याची सूट देण्यात आली. आता आपण (त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे) आपल्या सर्व शेजारी देशांसोबतचे संबंध बिघडवून बसलोय, असे स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, भारताने अफगाणिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा तालिबानने दिला आहे. त्यांनी (भारताने) अफगाणिस्तानमधील लोकांना आणि देशातील राष्ट्रीय प्रकल्पांना मदत केली आहे. त्यांनी यापूर्वीही मदत केलीय. त्याचे आम्हाला कौतुक आहे. पण, जर ते अफगाणिस्तान लष्कराच्या मदतीला आले किंवा त्यांनी इथे आपली उपस्थिती दाखवली तर त्यांच्यासाठी (भारतासाठी) हे चांगले ठरणार नाही. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये इतर देशांनी सैन्य पाठवले तेव्हा काय घडले हे पाहिलं आहे. हे सर्व प्रकरण त्यांच्यासाठी एखाद्या खुल्या पुस्तकाइतके स्पष्ट आहे, असे तालिबान प्रवक्ता मोहम्मद सोहिल साहीनने बोलताना म्हटले आहे.