१० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असलेल्या जिल्ह्यांत कडक निर्बंध करा!
केंद्राचे राज्य सरकारांना आवाहन

नवी दिल्ली : कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक असून कांजण्यांप्रमाणे वेगाने संसर्ग पसरत असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे संक्रमणाचा वेग अधिक पटीने वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असलेल्या जिल्ह्यांनी कडक निर्बंध घालावेत, असं आवाहन केलं आहे.
संशोधनातून आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाने सर्वत्रच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच देश कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल १९ कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातले आहे. अनेक देशात डेल्टा व्हेरिएंटचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे.
देशातल्या ४६ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपेक्षा जास्त असून, ५३ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर पाच ते १० टक्क्यांच्या दरम्यान आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर या राज्यांमध्ये दररोज एक तर रुग्णसंख्या तरी वाढते आहे किंवा पॉझिटिव्हिटी दरही वाढत असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या राज्यांतल्या आरोग्य विभागाकडून कोविड-१९ चं सर्वेक्षण आणि व्यवस्थापनासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.
गेल्या काही आठवड्यांत १० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्यांनी नागरिकांच्या गर्दीवर, प्रवासावर निर्बंध आणावेत, जेणेकरून संसर्ग पसरणार नाही, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. १० टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. खासगी हॉस्पिटलनीही पीएसए ऑक्सिजन प्लांट्स उभारण्याचे निर्देश राज्यांनी द्यावेत आणि त्यांना त्यासाठी सहकार्य करावं, असंही केंद्राने म्हटलं आहे.
तत्पूर्वी, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिंएटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. वेगाने पसरणारा डेल्टाचा प्रकार, जो आधीच भारतात सापडला आहे, आता १३२ देश आणि प्रदेशांमध्ये आढळून आल्याचे आरोग्य संघटनेनं सांगितलं.
डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा एक इशारा आहे की हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल असे त्यांनी म्हटलं आहे. डेल्टाने अनेक देशांना हादरवून टाकले असले तरी, त्याचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी उपाय अजूनही आहेत. विशेषतः सोशल डिस्टसिंग पाळणे, मास्क घालणे, हाताची स्वच्छता याद्वारे डेल्टाचा प्रसार टाळता येऊ शकतो. कोरोना रोखण्यासाठी हे उपाय अजूनही काम करत आहे, पण आपल्याला आधीपेक्षा अधिक कार्यक्षम आणि अधिक प्रभावीपणे हे उपाय अंमलात आणण्याची गरज आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.




