मुंबई: ओमायक्रॉन व्हेरिएंट आता भारतातही वेगाने फैलावत आहे. राज्यात लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण होईल, परिस्थिती पाहून व त्यावर लक्ष ठेवून, टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारशी चर्चा करुनच लॉकडाऊनचा निर्णय होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच राजकीय बैठका, मेळाव्याच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे देखील टोपे यांनी सांगितलं.
जगभरातील ३८ देशामध्ये पसरलेला कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आता भारतातही वेगाने फैलावत आहे. केवळ चार दिवसांमध्ये देशातील ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. २ डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनची बाधा झालेला पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासून ६ डिसेंबरपर्यंत या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ पर्यंत पोहोचली आहे.
राज्यात डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला बाधित आढळला. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ७ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. भारतीय वंशाची महिला २४ नोव्हेंबरला नायजेरियातून पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. सोबत तिच्या दोन मुलीही होत्या. या तिघींच्या संपर्कात आलेल्या १३ जणांची तपासणी केली असता महिलेचा भाऊ, दोन मुली अशा सहा जणांनाही लागण झाल्याचे उघड झाले. पुण्यातील ओमायक्राॅन बाधित फिनलँड येथून परतला हाेता.
ओमायक्रोनची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार अलर्ट झाले असले तरी लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण असू शकतं. यासंदर्भात परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. परदेशातून आलेल्या १०० टक्के प्रवाशांचे स्क्रिनिंग केलं जात आहे. राज्यात जनुकीय तपासणी अर्थात जीनोमिक सिक्वेन्स तपासल्या जाणाऱ्या लॅब वाढवणार असून नागपूर आणि औरंगाबाद मध्ये नवीन लॅबची निर्मिती करण्यात येणार आहेत.
दरम्यान, ओमायक्रॉनचे रुग्ण जगभरात वाढत असताना आता देशातही मोठ्या वेगाने सापडू लागले आहेत. ओमायक्रॉनमुळे लसीचे दोन डोस घेतलाला व्यक्तीही संक्रमित होत आहे. याचाच अर्थ तुम्ही लस घेतली असेल तरी देखील ओमायक्रॉन तुम्हाला बाधित करू शकतो. यामुळे कोरोनाचे नियम पाळणे, काळजी घेणे या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत.
आतापर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले जे रुग्ण सापडले आहेत. ते हल्लीच दक्षिण आफ्रिकेचा दौरा करून आलेले होते किंवा हाय रिस्क देशांमधून प्रवास करून आलेल्या लोकांच्या संपर्कात होते. आता ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू शकते. कारण अनेक संशयित रुग्णांचा रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे ट्रेसिंगही करण्यात आले आहे.
मुंबईतील २ जणांना ओमिक्रॉनची लागण
राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. आता मुंबईतही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. परदेशातून मुंबईत आलेल्या दोघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून एकूण संख्या १०वर पोहोचली आहे. त्यामुळे आता राज्यातील चिंतेत वाढ झाली आहे. काल रविवारी एका दिवसांत राज्यात ७ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली होती.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईत आढळलेले दोन्ही ओमिक्रॉन रुग्णांमध्ये एक महिला आणि एक पुरुष आहे. ३७ वर्षीय ओमिक्रॉनबाधित पुरुष दक्षिण आफ्रिकेतील जोहांसबर्गहून २५ नोव्हेंबरला मुंबईत आला होता. तसेच त्या रुग्णासोबत राहिलेली ३६ वर्षीय महिला २५ नोव्हेंबरला अमेरिकेहून मुंबईत आली होती. दोघांनाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या दोघांनाही कोणतीही लक्षणे नाहीत. या दोन्ही रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच या दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले होते, त्यांनी फायझरची लस घेतली होती. या दोन्ही रुग्णांच्या ५ अति जोखमीच्या आणि ३१५ कमी जोखमीच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.
राज्यात १ नोव्हेंबारपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ३४ प्रयोगशाळा नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.
ओमायक्रॉन फैलावत असतानाच कर्नाटक-तेलंगणात कोरोनाचा विस्फोट
ओमायक्रॉन व्हेरिअंटचा धोका वाढत असतानाच कर्नाटकातील सरकारी शाळा आणि तेलंगणातील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बॉम्ब फुटला आहे. कर्नाटकातील चिकमंगळूरमध्ये एका सरकारी निवासी शाळेतील ५९ विद्यार्थी तसेच १० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच बरोबर तेलंगणातील करीमनगर येथील चालमेडा आनंद राव वैद्यकीय विज्ञान संस्थेत ४३ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
कर्नाटकातील चिकमंगळुरू येथील सर्वोच्च जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले, की कोणत्याही संक्रमित विषाणूची लक्षणे आढळली नाहीत. चिकमंगळुरूचे उपायुक्त केएन रमेश म्हणाले, घाबरण्याची गरज नाही, कारण वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत आणि एक रुग्णवाहिकाही स्टँडबाय ठेवण्यात आली आहे. दरम्यान, ४५० निवासी विद्यार्थ्यांची नोंद असलेली शाळा सील करण्यात आली असून सॅनिटाइझही करण्यात आली आहे. तसेच, संक्रमित विद्यार्थी आणि कर्मचारी यांना वसतिगृहाच्या एका भागात क्वारंटाइन करण्यात आले आहे.
तेलंगणातील बोमक्कल गावातील मेडिकल कॉलेजमध्ये ४३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त असून अद्याप सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे. डिस्ट्रिक्ट मेडिकल हेल्थ ऑफिसरने रविवार सांगितले की, अद्याप कॉलेजकडून इतर माहिती देणे बाकी आहे. तेलंगणात सोमवारपर्यंत कोरोनाचे एकूण ३ हजार ७८७ सक्रिय रुग्ण होते. तसेच राज्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ९९९ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.