Top Newsराजकारण

कामावर हजर न झाल्यास उद्यापासून एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई!

मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या आपल्या मुख्य मागणीसाठी गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपामुळे एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आज २३ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. आज रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर उद्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात होणार आहे. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई होऊ शकते, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली आहे.

विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अद्यापही ठाम आहेत. जोपर्यंत विलिनीकरण नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. संपाची नोटीस देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने सोमवारी संप मागे घेण्याची घोषणा एसटी महामंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर केली. यावेळी निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या याप्रकरच्या कारवाया मागे घेण्यावर देखील चर्चा झाली. निलंबन मागे घेतले जाईल, मात्र दोन दिवसांमध्ये कामावर रुजू व्हा असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने कर्मचाऱ्यांना करण्यात आले होते. मात्र आज अंतिम मुदत संपत असून देखील कामावर हजर कर्मचाऱ्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे जे उद्या कामावर हजर होणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आता राज्य शासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात येऊन, एसटी कर्मचाऱ्यांना क वर्गाचा दर्जा देण्यात यावा, ही त्यांची मुख्य मागणी आहे. त्यासोबतच वेतन आणि महागाई भत्त्यात वाढ करावी, घरभाडे भत्ता वाढवावा अशा विविध मागण्या त्यांनी केल्या होत्या. यातील अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र तरी देखील एसटी कर्मचारी हे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अडून बसल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत विलिनीकरण नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान उद्या जे कर्मचारी कामावर हजर राहणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा महामंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button