मुंबई : राज्य सरकारने पगारवाढ दिल्यानंतरदेखील एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. एसटी महामंडळाचे विलगीकण केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे आंदोलन मागे घेतले नाही तर आम्हाला पगारवाढीच्या निर्णयावर विचार करावा लागेल, असा सूचक इशारा राज्य सरकारने दिलाय. यानंतर राज्यात काही आगारातून बसेस धावल्या आहेत. तर काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. तर दुसरीकडे काही ठिकाणी बसेसवर हल्ला तसेच दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, राज्यात एकूण ११ ते १३ बसेसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर अज्ञात व्यक्तींच्या विरोधात एसटी महामंडळाने गुन्हा दाखल केलाय. स्थानिक पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानुसार जळगाव आगाराची पहिली बस एमएच २० बीएल ३४५१ जामनेर येथे रवाना झालेली होती. जामनेर येथून दुपारी २ वाजता परतीचा प्रवास करीत असताना नेरी जवळील गाडेगाव घाटात जामनेर आगाराचा वाहक उमेश आवटी एका आयशर ट्रकमागे लपून बसला होता. बस समोर येतात त्याने धारदार दगड बसच्या काचेवर भिरकावला. एसटी बस चालक सोपान सपकाळे चालक यांनी प्रसंगावधान राखून जागेवर वळण घेतल्याने बसचा समोरील काच थोडक्यात बचावला. याप्रसंगी बसमध्ये साध्या वेशात बसलेल्या पोलिस तसेच जळगाव आगारातील वाहक गोपाळ पाटील यांनी संबंधित व्यक्तीचा पाठलाग केला असता तो एका शेतात सापडला. यासंदर्भात जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. याप्रसंगी पोलीस ठाण्यात जामनेर आगार व्यवस्थापक कमलेश धनराळे, वाहतूक नियंत्रक संभाजी पाटील उपस्थित होते.
नाशिक : नाशिक १ आगाराची बस मालेगाव ते नाशिक मार्गाने येत असताना उमराणेजवळ हल्ला करण्यात आला. या बसवर अज्ञात इसमाने दगड मारल्याने पुढील दर्शनी काच फुटली. तसेच चालकाच्या हाताला दुखापत झाली. धुळे ते नाशिक या मार्गाने दुसरी बस येत असताना उमराणे येथे देवळा फाट्याजवळ बसवर अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात बसची दर्शनी काच फुटली. तिसरी घटना एक बस नाशिक ते मालेगावकडे जात असताना सौंदाणे गावाजवळ घडली. या हल्ल्यात चाकलाच्या हाताला दुखापत झाली.
बीड : बीड आगारात अंबाजोगाई ते बीड अशा मार्गावर जात असताना मांजरसुम्बा चौकात उड्डाणपुलाखाली एका व्यक्तीने बसवर दगडफेक केली. दगड मारून बसच्या काचा फोडण्यात आल्या. पोलीस स्टेशन नेकनूर येथे यासंदर्भात तक्रार देण्यात आलीय. चालक, वाहक आणि प्रवासी असे कोणीही जखमी नाहीत.
जळगाव : जळगाव आगारातील एका बसवर अमळनेर ते जळगाव अशा मार्गावरुन जात असताना चांदणी कुऱ्हे येथे अचानकपणे हल्ला करण्यात आला. या हल्यात बसच्या काचा फोडण्यात आल्या असून चाकलाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तर अशाच प्रकारे जळगाव-रावेर मार्गावर एका बसची काच फोडण्यात आली. भुसावळ आगाराच्या बसवर दिपनगरजवळ एका अज्ञात व्यक्तीने दगड मारला. यात बसचा काच फुटला.
दिवसभरात ३०१० कर्मचारी निलंबित
सोलापूर विभागातदेखील दोन बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने कडक पवित्रा धारण केला आहे. एसटी महामंडळाने आज ३०१० कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. हा आकडा आता ६२७७ वर पोहोचला आहे. आज दिवसभरात २७० जणांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १४९६ जणांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.
कर्मचाऱ्यांचा लढा सुरूच राहणार: सदावर्ते
जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज स्पष्ट केलं. ते आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करत होते. गुणरत्न सदावर्ते यांनी आज दिवसभर एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. आम्ही उघड्या आकाशाखाली बसलो आहोत. आम्ही कष्टकऱ्यांचा लढा सुरूच ठेवणार आहोत. डंके की चोटपर आमचा लढा सुरूच राहील. आम्ही माघार घेणार नाही. विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं सदावर्ते यांनी सांगितलं.