मुंबई : शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. आयकर विभागाकडून यशवंत चव्हाणांच्या घरी छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सकाळी सहा वाजता जाधवांच्या घरी आयकर विभागाचं पथक दाखल झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी चौकशी, शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
सीआरपीएफ जवानांसह पथक त्यांच्या घरी दाखल झालं आहे. ईडीने ही कारवाई केली नसल्याचा दावा केला आहे, त्यामुळे ही इन्कम टॅक्स विभागाची धाड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यशवंत जाधव यांच्यावर १५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना नेते असल्याची चर्चा आहे.
शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच दाखल झाले. मुंबईतील माझगाव भागात असलेल्या त्यांच्या घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु असल्याचे समजते. सध्या त्यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार आहेत.
यशवंत जाधव यांच्याकडे पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा आहे. जाधवांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. यशवंत जाधव यांच्यावर १५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचा आणखी एका नेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचं दिसत आहे.
दरम्यान, जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्याचं पाहायला मिळालं होतं.
ईडीने धाड टाकल्याचा संभ्रम
यशवंत जाधवांच्या घरी ईडीने धाड टाकल्याची चर्चा सुरुवातीला होती. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपण ही छापेमारी केली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही आयकर विभागाची धाड असल्याचे बोलले जात आहे. आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांना नोटीस पाठवली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाधवांवर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनी ईडी- आयकर विभागाला तक्रार केल्यानंतर यशवंत जाधव यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तिला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे.