मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून सातत्याने चर्चेसाठी आवाहन केलं जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत हे आंदोलन आता नेतृत्वहीन झालंय. चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना ते युनियनचं ऐकतात ना भाजप नेत्यांचं, असे मत अनिल परब यांनी व्यक्त केलंय. आम्ही त्यांच्याशी बोलायला तयार आहोत, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्याशी दोनदा चर्चा केली. दोन्ही वेळा त्यांनी कामगारांशी बोलतो आणि कळवतो असं सांगितले. परंतु त्यांच्याकडून पुढे काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे नेमकं आंदोलनाचं नेतृत्व करतंय कोण? यावर प्रश्नचिन्ह आहे असं परब यांनी सांगितले.
एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी, पुन्हा रुळावर आणण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा झाली. त्या बैठकीत विविध पर्याय तपासण्याची सूचना दिली. एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. एसटी खासगीकरणाचा विचार केला नाही. परंतु वेगवेगळ्या पर्यायात खासगीकरण हादेखील पर्याय आहे. कामगारांसोबत लोकांचीही जबाबदारी राज्य सरकारची आहे. आता निर्णय कामगारांनी घ्यायचा आहे. सध्या एसटीच्या स्थितीवरुन वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करत आहोत. तिथली वाहतूक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे वेतन याचा आढावा घेतला जात आहे, असे परब यांनी सांगितले.
फडणवीसांनी दिलेल्या फॉर्म्युल्यावर गांभीर्यानं विचार
फडणवीस यांनी प्रवाशी कराचा फॉर्म्युला सांगितला. जो आम्ही गांभीर्यानं घेतला आहे. कोरोनापूर्व काळात हा फॉर्म्युला शक्य होता. आता खूप मोठा गॅप पडलाय. आताही तो करता येईल. त्यासाठी संप मागे घ्यावा लागेल. शासनाचे आर्थिक गणित पाहूनच मगच निर्णय घेतला जाईल, असंही परब यांनी स्पष्ट केलय. महत्वाची बाब म्हणजे जे रोजंदारी कर्मराची आहेत त्यांनी २४ तासांत कामावर हजर राहण्याचे अल्टिमेटम देण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर कारवाई सुरु झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या
राज्यभर पेटलेला एसटी आंदोलनाचा वणवा आता भडकला असून, त्यात आर्थिक परिस्थितीमुळे हतबल कर्मचारी टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आगारातील आणखी एका चालकाने कमी पगारामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गहिनीनाथ गायकवाड, असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गायकवाड यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समजते.
नाशिक आगारात ५१ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस
नाशिक आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन जोरात सुरू आहेत. हे आंदोलन दडपण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले असून, त्यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या ५१ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे. आतापर्यंत ८५ हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आता नोटीस पाठविलेल्या कर्मचाऱ्यांना चोवीस तासांच्या आत कामावर या, अन्यथा कारवाई करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून, आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यात निर्माण झाली आहे.