
कोलंबो : कृणाल पांड्याचे कोरोना पॉझिटिव्ह होणे, त्याच्या संपर्कात आलेल्या ८ प्रमुख खेळाडूंना विलगीकरणात जावे लागल्यानंतर हाताशी असलेल्या खेळाडूंसह टीम इंडियाला मैदानावर उतरणे भाग होते. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. श्रीलंकेनं ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या लढतीत टीम इंडियाला लाजिरवाणा पराभव पत्करण्यास भाग पाडले. या विजयासह श्रीलंकेनं तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. २००८ नंतर श्रीलंकेचा टीम इंडियावरील हा पहिलाच मालिका विजय आहे.
पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या ट्वेंटी-२० सावरणं अवघड गेलं. टीम इंडियाला ट्वेंटी-२०त शंभर धावांचा पल्लाही ओलांडता आला नाही. श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकांनी अफलातून झेल घेतले. वनिंदू हसरंगानं ४ षटकांत ९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. वनिंदूची ही ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. पहिल्याच षटकात दुष्मांता चमिराच्या चेंडूवर शिखर धवन स्लीपमध्ये झेल देऊन माघारी परतला. त्यापाठोपाठ देवदत्त पडिक्कल (९), संजू सॅमसन (०) व ऋतुराज गायकवाड (१४) हेही अपयशी ठरले.
टीम इंडियाची अखेरची होप नितिश राणा यालाही ६ धावांवर माघारी परतावे लागले. भारतानं पहिल्या १० षटकांत ५ बाद ३९ धावा केल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील टीम इंडियाची ही निचांक कामगिरी आहे. यापूर्वी २०१६साली न्यूझीलंडविरुद्ध नागपूर सामन्यात भारताचे ६ फलंदाज ४२ धावांवर माघारी परतले होते, तर २००८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४३ धावांत ५ विकेट्स पडल्या होत्या. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमार (१६) व कुलदीप यादव (२३*) यांनी सर्वाधिक धावा केल्या. भारताला ८ बाद ८१ धावांवर समाधान मानावे लागले. दासून शनाकाने २, चमिरा, मेंडीस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
माफक लक्ष्य डोळ्यासमोर असताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी कोणतीच घाई न करण्याचा निर्धार केलेला दिसला. अविष्का फर्नांडो व मिनोद भानुका यांनी अत्यंत सावध खेळ केला, परंतु राहुल चहरनं त्याच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली. फर्नांडोला ( १२) चहरनं स्वतःच्याच गोलंदाजीवर बाद केले. पुढच्या षटकात चहरनं दुसरा सलामीवीर मिनोदला १८ धावांवर पायचीत पकडले. १२ व्या षटकात चहरला आणखी एक यश मिळाले, सदीरा समरविक्रमा ( ६) त्रिफळाचीत झाला. चहरनं ४ षटकांत १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
पण, टीम इंडियाच्या धावाच एवढ्या कमी होत्या की त्यांचा बचाव करणे जवळपास अशक्यच होते. धनंजया डी सिल्व्हानं आक्रमक खेळ करताना श्रीलंकेचा विजय निश्चित केला. धनंजया २३ व हसरंगा १४ धावांवर नाबाद राहिले. श्रीलंकेनं ७ विकेट्स व ३३ चेंडू राखून विजय मिळवला. भारताची सलग ८ ट्वेंटी-२० मालिका जिंकण्याची मालिका खंडीत झाली.